अलिबागमध्ये कोळणींच्या मासे भरलेल्या पाटय़ा रस्त्यावर फेकल्या

सामना ऑनलाईन , अलिबाग

साफसफाईच्या नावाखाली अलिबाग नगरपालिकेच्या ठेकेदाराने कोळणींच्या मासे भरलेल्या पाटय़ा थेट रस्त्यावर फेकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. आश्चर्य म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देताच मध्यरात्री मासळी बाजारात घुसखोरी करून कर्मचाऱयांनी हा कारनामा केला असून अर्धी मासळीही पळवली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कोळीबांधवांनी पोलीस ठाण्यावर धडक देत ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.

अलिबाग शहरात पीएनपी नगरच्या मागे नगरपालिकेने मासळी बाजार बांधला आहे. कोळीबांधव मासळी विकून झाली की मच्छीचे बॉक्स शेडमध्येच ठेवून घरी जातात. या मार्केटची स्वच्छता करताना मासळीच्या पाटय़ा उचलल्या जातात. त्यासाठी नगरपालिकेने नेमलेला ठेकेदार तांबे व त्याची माणसे मासे विक्रेत्यांना पूर्वकल्पना देतात. मात्र 1 सप्टेंबरला मध्यरात्री ठेकेदाराने कोणतीही माहिती न देता स्वच्छतेच्या नावाखाली माशांनी भरलेल्या पाटय़ा थेट रस्त्यावर फेकल्या. इतकेच नाही तर जाताना पापलेट, सुरमई व कोलंबीही पळवून नेल्याचा आरोप कोळीबांधवांनी केला आहे. या घटनेनंतर दुसऱया दिवशी संतप्त झालेल्या महिलांनी थेट पोलीस ठाण्यावर धडक देत मुजोर ठेकेदारावर कारवाईची मागणी केली.

अखेर ठेका केला रद्द

कोळीबांधवांच्या जबरदस्त आंदोलनाचा सत्ताधारी शेकापने चांगलाच धसका घेतला. नगराध्यक्ष प्रशांत नाईक तसेच अन्य नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेत मासेविक्रेत्या महिलांची समजूत काढली. त्याचबरोबर साफसफाईचा ठेका असलेल्या तांबेचा ठेकाही रद्द केला.