
सामना प्रतिनिधी । मुंबई
एक पंधरा वर्षांचा मुलगा घाटकोपर स्थानकात दोघा टीसींना फिरताना दिसला त्यावेळी त्याची चौकशी केली असता एक अपहरणनाट्य उघड झाल्याची घटना मंगळवारी घडली. या मुलाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्याला त्याच्या पालकांकडे सुखरूप पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलणाऱ्या मध्य रेल्वेच्या टीसींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घाटकोपर स्थानकात विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या एका लहान मुलाकडे टीसींनी विचारपूस केली असता हा मुलगा गेले दोन दिवस बेशुद्धावस्थेत मुंबईत असल्याचे उघड झाले. वरिष्ठ तिकीट तपासणीस सिद्धेश जळगावकर व संदीप चितळे यांनी त्या मुलाला आपल्या कार्यालयात नेऊन खाण्यासाठी नाश्ता दिला. हा मुलगा एकटाच फिरत असून त्याला नेमके तो कुठे आहे हेच समजत नव्हते. म्हणूनच या दोघांनी त्याची आस्थेने चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव जीत महातो (15)असल्याचे सांगितले. त्याच्या पालकांना कोलकाता येथे संपर्क करून ही बातमी दिली. कोलकात्यातील घरातून सायकलवर बाहेर पडलेल्या जीतचे चार ते पाचजणांनी अपहरण करून त्यास मुंबईत आणले असल्याचे त्याने सांगितले. या नाटय़ाचा उलगडा झाल्यानंतर कुर्ला रेल्वे पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
summary : ticket checker on ghatkopar station help boy to reunite with family



























































