
तिहार तुरुंगात गँगवॉर भडकलं, ज्यामध्ये टिल्लू ताजपुरिया नावाच्या कुख्यात गुंडाचा खून करण्यात आला. सळी भोसकून त्याला ठार मारण्यात आलं. टिल्लू याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर हा हल्ला योगेश टिंडा नावाच्या गुंडाने केल्याचं कळतं आहे. मात्र यामागचं कारण काय होतं हे अजून कळू शकलेलं नाहीये. दिल्लीतील रोहिणी न्यायालयामध्ये जितेंद्र गोगी नावाच्या एका गुंडाची हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणात टिल्लू याला अटक करण्यात आली होती.
दिल्लीमध्ये जितेंद्र उर्फ गोगी आणि सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरिया या दोन टोळ्या होत्या. दोन्ही टोळ्या सातत्याने एकमेकांवर हल्ले करत होत्या. गुंडगिरीच्या साम्राज्यात आपलेच वर्चस्व राहावे यासाठीच्या स्पर्धेतून टिल्लू ताजपुरियाच्या टोळीने कोर्टात घुसून जितेंद्र गोगी याचा खून केला होता. आरोपी वकिलाच्या वेशात आले होते आणि त्यांनी गोगी दिसताच अंदाधुंद गोळीबार केला होता.
टिल्लूच्या हत्येमागे गोगी टोळीचा हात असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. टिल्लू आणि गोगी टोळीचे वैर फार जुने आहे. एकेकाळी टिल्लू आणि गोगी हे चांगले मित्र होते, मात्र कालांतराने दोघांमध्ये पराकोटीचे वैमनस्य निर्माण झाले होते. या दोघांच्या टोळ्यांमध्ये वरचेवर संघर्ष होत होता, ज्यात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. टिल्लू हा ताजपुरिया गावचा रहिवासी आहे तर जितेंद्र गोगी हा अलीपूर गावचा रहिवासी होता. मैत्रीत दुरावा आल्यानंतर दोघांनी वेगळी टोळी तयार केली. 2010 मध्ये दिल्लीतील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीतून या दोघांमधील वैमनस्याला सुरुवात झाली होती.
टिल्लू ताजपुरिया याला आधी दिल्लीच्या मंडोली तुरुंगात ठेवण्यात आले होते, मात्र जितेंद्र गोगीच्या हत्येनंतर त्याला तिहार कारागृहात हलवण्यात आले. तो तुरुंगातूनच गुन्हेगारी विश्वाचा कारभार सांभाळत असे. त्याच्या गँगस्टर नीरज बवाना तुरुंगात गेल्यानंतर टिल्लू आणि गोगी गँगमधील वर्चस्वाचा लढा वाढला होता. यातून दोन्ही टोळ्यांमध्ये चकमक झाली आणि दोन्ही टोळ्यांच्या सदस्यांना आपला जीव गमवावा लागला.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र गोगीने गुन्ह्ये करून अमाप संपत्ती कमावली होती. जितेंद्र गोगीचे 50 खास साथीदार होते आणि विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली त्याला 2020 साली गुरुग्राममधून अटक करण्यात आली होती.
गोगी हा कुख्यात गुंड होता आणि एकट्या दिल्लीत गोगीवर चार लाख तर हरियाणामध्ये दोन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. याआधीही तो अनेकवेळा कोठडीतून फरार झाला होता. प्रसिद्ध हरियाणवी गायिका-नर्तिका हर्षिता हिच्या हत्या प्रकरणातही जितेंद्र उर्फ गोगीचेही नाव आले होते. गोगीकडून 6 स्वयंचलित विदेशी पिस्तुले, 70 हून अधिक जिवंत काडतुसे, पश्चिम विहारमधून लुटलेली कार जप्त करण्यात आली होती. आम आदमी पक्षाचे नेते वीरेंद्र मान यांच्यावर नरेला येथे गोगी टोळीच्या सदस्यांनी 26 गोळ्या झाडल्या.



























































