
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यांच्या निषेधार्थ शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने उद्या (दि. 16) ‘सोलापूर बंद’ची हाक देण्यात आली आहे. या बंदसाठी सर्व संघटना एकवटल्या असून, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी व धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून रॅली काढण्यात येणार आहे.
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याचे तीक्र पडसाद जिह्यात उमटत आहेत. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने या वक्तव्यांच्या निषेधार्थ उद्या (शुक्रवारी) सर्वपक्षीय ‘सोलापूर बंद’ची हाक देण्यात आली आहे. हा बंद दुपारी दोनपर्यंत राहणार आहे. शहरातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी, शैक्षणिक संघटना, धार्मिक आणि विविध मंडळांकडून या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष शेखर फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, उपमहापौर पद्माकर काळे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, युवक काँग्रेसचे गणेश डोंगरे, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे यांनी केले आहे.
सकाळी 9 वाजता शहरातून रॅली
शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी 9 वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता होणार आहे.
पोलीस बंदोबस्त
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली. पोलीस बंदोबस्त, पेट्रोलिंग, फिक्सपॉइंट, आर.सी.पी.क्यू. आरसीटी पथक व जलद प्रतिसाद पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे, असेही विजय कबाडे यांनी सांगितले.



























































