
सामना ऑनलाईन । सारांस्क
फिफा वर्ल्ड कपमध्ये आज (दि. २५) पोर्तुगाल विरुद्ध इराण लढतीकडे तमाम फुटबॉल शौकिनांचे लक्ष असेल. कारण ‘ब’ गटाच्या या लढतीत उभय संघांमधील जो संघ हरेल तो आता घरी जाणार आहे. त्यामुळे अस्तित्वाच्या या लढाईमध्ये पोर्तुगाल व इराण संघांचे खेळाडू सर्वस्व पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो विरुद्ध इराण अशी ही लढत रंगण्याची शक्यता आहे. पोर्तुगालचा संघ एक विजय आणि एका बरोबरीसह ४ गुणांची कमाई करीत आपल्या गटातून दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे एक विजय व एका पराभवासह ३ गुणांची कमाई करणारा इराणचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे उद्या यातील जो संघ जिंकेल तो बाद फेरीत दाखल होणार आहे. इराणने मोरोक्कोवर सनसनाटी विजय मिळवून गुणांचे खाते उघडले होते, मात्र दुसऱ्या लढतीत स्पेनकडून त्यांचा पराभव झाला. कागदावर पोर्तुगालचे पारडे नक्कीच जड आहे. मात्र सांघिक खेळ हा अनिश्चिततेचा असतो. शिवाय इराणने स्पेनसारख्या बलाढय़ संघाला ५४ मिनिटांपर्यंत गोल करू दिला नव्हता. त्यामुळे पोर्तुगालसाठी नक्कीच उद्याची लढाई सोपी नसेल. मात्र फॉर्ममध्ये असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगालचा प्लस पॉइंट होय. या स्टार स्ट्रायकरनेच स्पेनविरुद्ध हॅटट्रिक केली होती. मोरोक्कोविरुद्धचा एकमेव गोलही रोनाल्डोनेच मारला होता. त्यामुळे सोमवारीही पोर्तुगाल संघालाच विजयासाठी पसंती मिळत आहे.
आजच्या लढती
उरुग्वे वि. रशिया (रात्री ६.३० वा.)
सौदी अरेबिया वि. इजिप्त (रात्री ७.३० वा.)
स्पेन वि. मोरोक्को (रात्री ११.३० वा.)
इराण वि. पोर्तुगाल (रात्री ११.३० वा.)






























































