कोरोनाचे भय; वेळापत्रकानुसार ऑलिम्पिक घेण्यास खेळाडूंचाच विरोध

511

महामारी म्हणून घोषित झालेल्या कोरोना विषाणूने शंभरहून अधिक देशांना विळखा घातला आहे. या विषाणूमुळे अवघ्या जगात हाहाकार उडालेला असताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ (आयओसी) ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यावर ठाम आहे. मात्र आता ऑलिम्पियन खेळाडूंनीच वेळापत्रकानुसार ऑलिम्पिक घेण्यास विरोध करायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सराव कसा करायचा? का आमच्या व आमच्या परिवाराच्या जिवाशी खेळताय? असा प्रक्षुब्ध सवाल आता खेळाडू करत आहेत.

क्रीडाविश्वातील सर्वोच्च असलेली ऑलिम्पिक स्पर्धा 24 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये होणार आहे, मात्र जपानही कोरोनाच्या कचाटय़ातून निसटलेला नाहीये. असे असतानाही ‘आयओसी’ नियोजित वेळेतच स्पर्धा घेण्यावर ठाम आहे. ग्रीसची ऍथलीट आणि ऑलिम्पिक व्हॉल्ट चॅम्पियन कॅटरीना स्टेफानिडी आणि इंग्लंडची कॅटरीना जॉन्सन या खेळाडूंनी जाहीरपणे चिंता व्यक्त केली आहे. आम्ही आमच्या कुटुंबीयांचे स्वास्थ्य धोक्यात घालून ऑलिम्पिकसाठी सराव करावा असे ‘आयओसी’ला वाटते काय? असा थेट सवाल स्टेफानिडी हिने ट्विटरवर केला. तुम्ही चार महिन्यांनंतर नाही तर आतापासूनच खेळाडूंना जिवाशी खेळायला लावताय, असा टोलाही तिने लगावला. स्टेफानिडाने पुढे लिहिले की, सांघिक खेळाडूंना सराव करायचा म्हटल्यास त्यांचा एकमेकांशी संबंध येणारच. त्यामुळे अशा खेळाडूंना तर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. जॉन्सन म्हणाली, ‘आयओसी’ जाणीवपूर्वक खेळाडूंच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतः सरावादरम्यान दबावात असते. अशा प्रतिकूल वातावरणात ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेची तयारी करता येणे शक्यच नाही. खेळाडूंनी आपला सराव सुरूच ठेवावा या ‘आयओसी’च्या सूचनेवर तिने टीका केली.

ऑलिम्पिक पात्रतेचा आकडाच अपूर्ण

टोकियो ऑलिम्पिक चार महिन्यांवर येऊन ठेपले आहे, मात्र जीवघेण्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द होत आहेत. जगभरातील 11 हजार खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत कौशल्य पणाला लावणार आहेत, मात्र त्यातील केवळ 4700 खेळाडूंनीच ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले असून उर्वरित खेळाडू स्पर्धेसाठी अद्याप पात्र ठरलेले नाही. ऑलिम्पिक स्पर्धेतील पात्र खेळाडूंचा आकडा अपूर्ण असल्याने टोकियो ऑलिम्पिकचे ठरल्या वेळेनुसार आयोजन होणे अशक्य वाटते.

टोकियो ऑलिम्पिक चाचणी जिम्नॅस्टिक स्पर्धा रद्द

कोरोनाच्या जगभरातील प्रसारामुळे टोकियो ऑलिम्पिक समितीने 4 ते 5 एप्रिल 2020 या कालावधीत जिम्नॅस्टिक चाचणी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कोरोना ही जागतिक महामारी घोषित झालेली असतानाही टोकियो ऑलिम्पिक संयोजन समितीने ऑलिम्पिक स्पर्धा होणारच असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे संकट ऑलिम्पिकपेक्षा मोठे!

आईस हॉकीमध्ये चार वेळा सुवर्णपदक जिंकणारी कॅनडामधील ‘आयओसी’ची सदस्य हॅली वाइकनहाइजर हिने कोरोनाचे संकट ऑलिम्पिक स्पर्धेपेक्षा मोठे असल्याचे सांगत महासंघाला घरचा आहेर दिला. ठरल्या वेळापत्रकानुसार ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची भूमिका म्हणजे बेजबाबदारपणा होय. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच खेळाडूही घाबरलेले आहेत. मग ते मनमोकळा सराव कसा करणार. मी स्वतः खेळाडू असल्याने खेळाडूंच्या वेदाना मांडणे माझे कर्तव्य आहे. या कठीण परिस्थितीत मी खेळाडूंच्या बाजूने ठामपणे उभी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या