Paralympics Tokyo 2020 – विनोद कुमारचे कास्यपदक काढून घेतले, वर्गीकरणाच्या पुनर्मूल्यांकनात ठरला अपात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सोमवारी पाच पदकांची कमाई करीत एकूण आतापर्यंत सात पदकांवर मोहोर उमटवत इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. ज्या दिवशी हिंदुस्थानकडून ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली त्याच दिवशी हिंदुस्थानला एक धक्काही बसला. विनोद कुमारने सोमवारी थाळीफेक (एफ 52) या प्रकारात पटकावलेले कास्यपदक काढून घेण्यात आले. विरोध झाल्यानंतर करण्यात आलेल्या वर्गीकरणाच्या पुनर्मूल्यांकनात तो अपात्र ठरला. यामुळे हिंदुस्थानच्या पदक तालिकेमधून एक पदक कमी झाले.

प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात चूक कशी काय झाली…

पॅरालिम्पिक ही खरेतर जगातील प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा. आंतरराष्ट्रीय स्तरावर विनोद कुमारसारखे प्रकरण घडायला नको होते. पॅरालिम्पिकआधी सर्व खेळाडूंच्या पॅटेगरीचे मूल्यांकन केले असेलच. त्यानंतर स्पर्धेचा प्रकार आटोपल्यानंतर कोणीतरी विरोध केल्यानंतर पुन्हा त्याचे मूल्यांकन करणे किती योग्य आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो. तसेच यावेळी हिंदुस्थानी पथकप्रमुखाकडूनही पाऊल उचलायला हवे होते. प्रत्यक्षात असे झाले नाही.