
संयुक्त शेतकरी मोर्च्याने पर्यावरणवादी कार्यकरता दिशा रवी हिच्या सुटकेची मागणी केली आहे. संयुक्त शेतकरी मोर्च्याने म्हटले आहे की, केंद्र सरकार शेतकरी आंदोलन संपवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत आहे. तसेच शेतकरी मोर्च्याने निवदेनाद्वारे केंद्र सरकारला दिशा रवि हिची बिनशर्त तुरुंगातून सुटका करावी अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
शेतकरी आंदोलनातील टूलकिटमध्ये बदल केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी दिशा रवी हिला अटक केली आहे. दिशाला रविवावी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने तिची रवानगी पाच दिवसांच्या विशेष कोठडीत केली आहे. दरम्यान, रविवारी सायबर सेल पोलिसांनी दिशाला द्वारका येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले होते.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास समर्थन दर्शविण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने एक ट्विट नुकतेच केले होते. या ट्विटसह तिने एक टूलकिट देखील ट्विट केले होते. जे नंतर डिलीट करण्यात आले होते. या टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 4 फेब्रुवारी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी शनिवारी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने दिशा रवी हिला अटक केली आहे. चौकशी दरम्यान दिशाने आपण टूलकिटमध्ये बदल करुन व्हायरल केल्याचे मान्य केले आहे.
टूलकिट म्हणजे काय ?
कुठल्याही मोठ्या आंदोलनावेळी टूलकिट शेअर केले जाते. आंदोलनावेळी पाठिंबा कसा वाढवायचा, कुठले हॅशटॅग वापरायचे, आंदोलनावेळी काही अडचण आली तर ती कुणाला विचारायाची? आंदोलनावेळी काय करावे काय करू नये याबबत सर्व सूचना या टूलकिटमध्ये दिल्या जातात.



























































