पाकव्याप्त कश्मीरमध्ये 16 दहशतवादी प्रशिक्षण शिबीरे सक्रीय; घुसखोरीचा धोका वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी सुरक्षा दल कश्मीर खोऱ्यातून दहशतवाद आणि दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन करत असताना त्यांच्यासमोर घुसखोरांना रोखण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. हिंदुस्थानी गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार पाकव्याप्त कश्मीरमध्ये 16 दहशतवादी प्रशिक्षण शिबीरे सक्रीय आहेत. या शिबीरांमध्ये दहशतवाद्यांना कश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचे मोठे आव्हान सुरक्षा दलासमोर उभे आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदसह इतर दहशतवादी संघटनांना मोठा हादरा बसला आहे. कश्मीर खोऱ्यातील जनतेकडून आणि युवकांकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याने घुसखोरीचा मार्ग दहशतवाद्यांनी निवडला आहे. त्यासाठी पाकव्याप्त कश्मीरमध्ये 16 दहशतवादी प्रशिक्षण शिबीरे सक्रीय झाली आहेत. त्यांना पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयची मदत मिळत आहे. तसेच पाकिस्तानी लष्करही त्यांना घुसखोरीसाठी मदत करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही शिबीरे सक्रीय झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या शिबीरात घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हिंदुस्थानी गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या माहितीनंतर सुरक्षा दलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि दहशतवाद्यांच्या हालचालींवर नजर असल्याचे गुप्तचर खात्याने स्पष्ट केले आहे. घुसखोरी आणि दहशतवाद्यांच्या प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचे सुरक्षा दलाने म्हटले आहे.

सुरक्षा दलाला ऑपरेशन ऑल आउटमध्ये चांगले यश मिळाले आहे. अल कायदाशी संबधित असणाऱ्या अंसार गजवत उल हिंदचा म्होरक्या जाकीर मुसाच्या खात्म्यानंतर दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या आठवड्यात पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा करण्यात आला होता. कश्मीर खोऱ्यात दहशतवादी संघटना पसरवण्याचे प्रयत्न सुरक्षा दल हाणून पाडत आहेत. तसेच दहशतवादाचा मार्ग निवडणाऱ्या स्थानिक तरुणांच्या संख्येत घट झाल्याचे जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. राज्यात सध्या 275 दहशतवादी सक्रीय असून त्यातील 75 परदेशी असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा दलाकडून या दहशतवाद्यांचा लवकरच खात्मा करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, पाकव्याप्त कश्मीरमध्ये सक्रीय झालेली दहशतवादी प्रशिक्षण शिबीरे आणि घुसखोरीची शक्यता लक्षात खोऱ्यात सुरक्षा दलाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.