
अक्कलकोट तीर्थक्षेत्री धार्मिक पर्यटनार्थ येणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मात्र, म्हाडा कॉलनीलगत पर्यटन विकास महामंडळाकडून बांधण्यात आलेल्या अद्ययावत रिसॉर्टचे अद्यापि उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे इमारतीसह परिसराला काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. ही इमारत वापरात कधी येणार? असा सवाल स्वामिभक्त पर्यटक व शहरवासीयांतून होत आहे.
राज्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याकरिता तीर्थस्थळे विकसित होण्याकरिता राज्य शासनाकडून पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्याच्या विविध जिल्ह्यांत महामंडळाचे निवास-रिसॉर्ट बांधण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या काळात हे काम बंद ठेवण्यात आले. त्यानंतरच्या काळात काम सुरू करण्यात आले. या काळातच अक्कलकोट येथील रिसॉर्टची अंतर्गत कामे अर्धवट राहिली होती. त्यानंतर ही कामे पूर्ण झाली असून, महामंडळाकडून उद्घाटन करण्याची तयारी करण्यात आली. मात्र, अद्यापि या रिसॉर्टचे उद्घाटन झालेले नाही.
तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता गेल्या महिन्याभरात सतत भाविकांची गर्दी वाढत आहे. अनेक भक्तांना निवासस्थान न मिळाल्याने त्यांना सोलापूरसह नजीकचे तीर्थक्षेत्र गाठावे लागले. श्री वटवृक्ष देवस्थान व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे भक्तनिवास, यात्री निवास, यात्री भवन यांसह भक्तांना मुक्कामाकरिता देवस्थान व न्यासाच्या सर्व त्या सुविधा हाऊसफुल्ल झाल्याने भक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
पर्यटन विकास महामंहळाचे निवास- रिसॉर्ट हे संपूर्णपणे सज्ज असतानाही लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून रखडला आहे. त्यामुळे या रिसॉर्टला काटेरी झुडपांनी विळखा घातला असून, संपूर्ण इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. रूममधील टीव्ही, बेड, विविध सोयी धूळखात पडून आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालून या इमारतीचे लवकरच लोकार्पण करण्याची मागणी स्वामिभक्त व शहरवासीयांतून होत आहे.



























































