
उतारावर पार्क केलेल्या ट्रक्टरच्या चाकांखाली लावलेले दगड काढून ट्रक्टर सुरू करून आसनावर उडी मारून बसताना ट्रक्टरमालक तोल जाऊन चाकाखाली पडला. त्यामध्ये तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना भोसे (ता. कोरेगाव) येथे घडली. सुहास विश्वास माने (वय 40) असे ट्रक्टर मालकाचे नाव आहे.
ट्रक्टर लवकर सुरू होत नसल्यामुळे सुहास माने यांनी तो आपल्या परडय़ातील उताराच्या जागी चाकांना दगड लावून पार्क केला होता. सकाळी सुहास माने हे ट्रक्टर बाहेर काढण्यासाठी परडय़ात गेले. प्रथम त्यांनी ट्रक्टरमागे औजारे जोडली. त्यानंतर ट्रक्टरच्या मध्यभागी उभे राहून दगड काढून ट्रक्टर सुरू करून वर बसण्यासाठी उडी मारली.
मात्र, सीटवर बसताना अचानक तोल जाऊन ते चाकाखाली पडले. आसपास हे पाहण्यासाठी अथवा मदतीसाठी कोणीच नसल्याने बराच काळ ते ट्रक्टरच्या चाकाखाली गंभीर जखमी अवस्थेमध्ये अडकून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, बराच वेळ ट्रक्टर सुरू असल्याचा आवाज कसा येत आहे, हे पाहण्यासाठी शेजारील एक महिला घटनास्थळी गेली असता ते दृश्य पाहून त्यांनी इतर लोकांना सांगितले. या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.





























































