गडकरी, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूककोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ठाण्याजवळील अंजूर दिवे येथे दोन नव्या मार्गांचे भुमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान गुरुवारी ठाणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी झालेल्या रोडशोमुळे कोनगाव आणि माजिवडे दरम्यान हजारो वाहनांसह अँब्युलन्सही अडकल्या होत्या. त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला. एरवी 15 मिनिटांत पार करता येणारे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना दीड तास घालवावा लागला. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आयोजीत कार्यक्रमामुळेच अनेक वाहने जवळपास 30 मिनिटे एकाच जागेवर खोळंबली होती.

मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे-भिवंडी बायपास रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढत असल्याने ती गरज लक्षात घेऊन या रस्त्यावर आठ पदरी काँक्रीट रस्ता बनविण्यात येत आहे. तसेच शहापूर-मुरबाड-खोपली-कर्जत या नव्या राष्ट्रीय महामार्ग अशा दोन मार्गांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी येथील वाहतूक आणखी सोयीस्कर करण्यासाठी या भागात उन्नत डबलडेकर एअरबस प्रकल्प, मेट्रो लाईन आणि जलमार्गाची निर्मिती देखील करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

या कार्यक्रमात विकासकामांच्या दिरंगाईमध्ये उशीर झाल्याचे मान्य करत लवकरात लवकर सुधारणा करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या भागातील विकासकामांना प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम सरकार करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र कार्यक्रमादरम्यान वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.