
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी आता कमी होणार आहेत. तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारणही ट्रेनमध्येच होणार आहे. त्यासाठी प्रत्येक लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये एक ट्रेन कॅप्टनची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या ट्रेन कॅप्टनला विशेष गणवेश आणि बॅच देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या समस्या सोडवणे ही या कॅप्टनची मुख्य जबाबदारी असेल. यासाठी रेल्वेने त्यांच्या १६ झोनमध्ये सूचनापत्र पाठवले आहेत. तसेच लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या दक्षिण विभागात आणि काही लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
रेल्वेतील पाण्याची व्यवस्था, कोच आणि शौचालयांची स्वच्छता, रेल्वेची साफसफाई, विजेचे पाँइट, पंखे, दिवे, चार्जिंग पाँइटची देखभाल याची जबाबदारी रेल्वे कॅप्टनची असेल. तसेच ट्रेनमधील कॅटरिंग स्टाफ, टिकिट कलेक्टर, आरपीएफ जवान आणि लोको पायलटही रेल्वे कॅप्टनच्या देखरेखीखाली काम करणार आहेत. आतापर्यंत रेल्वे प्रशासन ट्विटरच्या माध्यमांतून प्रवाशांच्या समस्या जाणून घेत होते. तरीही प्रवाशांचा तक्रारींची योग्य दखल घेण्यात येत नव्हती. त्यामुळे प्रवाशांचा समस्या आणि तक्रारी वाढतच होत्या. ट्रेनने सूचना आणि तक्रार पेटीही रेल्वेत ठेवली होती. त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे प्रवाशांच्या समस्या ट्रेनमध्येच सोडवण्यासाठी आता ट्रेन कॅप्टनची नियुक्ती करण्यात येणार असून प्रवाशांचा त्रास कमी होऊन त्यांचा प्रवास सुखकर होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
























































