‘आरएसएस’च्या बैठकीला 3 किलोमीटरपर्यंत खडा पहारा, देशभर भाजपची सत्ता आणण्याचे स्वप्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चित्रकूटमध्ये प्रचंड गोपनीयता व कडेकोट सुरक्षेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) बैठक पार पडत आहे. बैठकीच्या सभागृहापासून जवळपास 3 किलोमीटरपर्यंत बॅरिकेड्स लावली असून पाच जिह्यांतील पोलिसांचा खडा पहारा देण्यात आला आहे. संघाची प्रतिमा सुधारून केंद्रासह राज्यांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी बैठकीत ‘मास्टर प्लॅन’ची आखणी केली जात आहे. याच अनुषंगाने धर्म, संस्कृती, राजकारणाच्या प्रत्येक मुद्दय़ावर चर्चा केली जाते.

पाच दिवसीय अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला 50 ते 55 प्रचारक प्रत्यक्ष चित्रकूटमध्ये पोहोचले असून जवळपास 250 प्रचारक ऑनलाइन सहभागी होत आहेत. बैठकीतील कुठलाच विषय बाहेर ‘लीक’ न करण्याच्या सक्त सूचना पदाधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ‘मास्टर प्लॅन’ बनवण्याची तयारी केली जात आहे.

संघाची प्रतिमा धर्मनिरपेक्ष बनवण्याकडे कल?

संघाने आपला चेहरा धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे का, संघाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा देश आणि राज्यांमध्ये भाजपचे सरकार बनवण्यास उपयोगी ठरेल का, भाजपचे पारंपरिक मतदार संघाची ही नवीन धर्मनिरपेक्ष प्रतिमा स्वीकारतील का, देशात कोरोनाची तिसरी लाट आल्यास संघ कशा प्रकारे सेवेची भूमिका बजावेल या प्रमुख प्रश्नांवर संघाच्या चिंतन बैठकीत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

चर्चेचे इतर प्रमुख मुद्दे

  • मोदी सरकारने कठोर शिक्षेची तरतूद करीत धर्मांतराचा केंद्रीय कायदा बनवावा, जेणेकरून 2024 मध्ये हा कायदा निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवता येईल.
  • धर्मांतर रोखण्याच्या कायद्यावरही चर्चा. मुस्लिमांचा एक मोठा वर्ग स्वतःहून घरवापसीच्या तयारीत असल्याचे संघाच्या सूत्रांचे मत आहे.
  • देशातील मुस्लिमांची वाढती संख्या संघासाठी चिंतेचा विषय आहे. याबाबतही केंद्रीय कायदा करण्याच्या रणनीतीवर चर्चा.
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारची प्रतिमा सुधारण्यावर भर. निवडणुकीत अनेक आमदारांचा पत्ता कट होणार. केंद्राप्रमाणेच योगी सरकारच्या मंत्रिमंडळातही फेरबदलाच्या हालचाली.