तिहेरी हत्याकांडाने त्रिपुरा हादरले

43

सामना ऑनलाईन। धालाई

त्रिपुरातील धालाई जिल्हा तिहेरी हत्याकांडाने हादरला आहे. येथील पैसेराम कारबारी पारा या गावात अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात तीन जणांवर कुऱ्हाडीने घाव घालत त्यांची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. यात एक महिला जखमी झाली आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. किरकोळ कारणावरून या तिघांचा आरोपीशी वाद झाला होता. पण राग अनावर झाल्याने आरोपीने कुऱ्हाडीने तिघांना संपवले. रविवारी रात्री ही घटना घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

आरोपी मुलगा व मृत व्यक्ती या नातेवाईक असल्याचे समजते. रविवारी रात्री या तिघांबरोबर आरोपीचा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात तिघांपैकी एकजण मुलाच्या अंगावर धावून गेला. यावेळी एकजण त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला. हे बघून संतप्त आरोपीच्या रागाचा पारा अधिकच चढला. त्याने बाजूलाच पडलेली कुऱ्हाड उचलली व मागचा पुढचा विचार न करता या चौघांवर हल्ला केला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथी व्यक्ती जखमी झाली. तिघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून आरोपीने तिथून पळ काढला. पण पोलिसांनी संपूर्ण गाव पिंजून काढले व आरोपीला शोधून काढले.

आपली प्रतिक्रिया द्या