
अपघात झाल्याच्या बतावणीने ट्रकचालकाला धमकावून मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी रोकड, मोबाइल असा मुद्देमाल लुटल्याची घटना कोंढवा भागात घडली. याबाबत एका ट्रकचालकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ट्रकचालक मूळचा राजस्थानमधील मेवाड जिल्ह्यातील आहे. हैद्राबादमधील एका कंपनीचा माल पुण्यात पोहचविण्यासाठी तो ट्रक घेउन आला होता. कोंढवा भागातील न्याती इस्टेट परिसरात दुपारी एकच्या सुमारास मोटारीतून आलेल्या तीन चोरट्यांनी ट्रक थांबविण्याचा इशारा केला.
त्यावेळी संबंधित भागात फारशी वर्दळ नव्हती. चोरट्यांनी मोटार ट्रकला आडवी लावली. मोटारीला ट्रक घासून गेल्याने नुकसान झाल्याची बतावणी केली. ट्रकचालकाला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
त्यानंतर चोरट्यांनी ट्रकचालकाला धमकावून पाच हजारांची रोकड, मोबाइल असा मुद्देमाल लुटला. मोटारीतून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे तपास करत आहेत.




























































