सँडहर्स्ट रोडमध्ये पाणी तुंबू नये म्हणून रुळाखाली बोगदा!

पावसाळ्यात रुळांवर पाणी तुंबून लोकलमध्ये प्रवासी अडकून पडण्याचे वाढते प्रकार पाहून पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा स्थानकात ‘मायक्रो टनेलिंग’ प्रकल्प राबवला होता. आता मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्थानकाच्या दरम्यानही तुंबलेले पावसाचे पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळण्यासाठी 400 मीटर पाइपलाइन (मायक्रो टनेलिंग) टाकली जात आहे.

 दरवर्षी कांजुरमार्ग, विक्रोळी, विद्याविहार, कुर्ला, चुनाभट्टी, टिळकनगर येथे रुळांवर पाणी साचत असल्याने लोकल सेवा ठप्प होत असते. त्यामुळे मध्य रेल्वेने पावसाळ्यात लोकलची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नालेसफाईपासून घाट सेक्शनमध्ये धोकादायक दरड आणि झाडांच्या फांद्या हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. कर्जत आणि कसारानंतरच्या घाट सेक्शनमध्ये दरडी कोसळून अपघात होत असतात ते टाळण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ही कामे केली जातात.

बोल्डर हटविण्याचे 40 टक्के काम पूर्ण

  • यंदा डिसेंबर-जानेवारी 2020 मध्ये घाटातील कामाची टेंडर प्रक्रिया सुरू झाली. प्रत्यक्षात मार्च 2021 मध्ये या कामाला सुरुवात झाली. कोसळण्याची शक्यता असलेल्या दरडी शोधून काढणे, त्यांचे स्कॅनिंग करणे आणि बोल्डर स्पेशल ट्रेनद्वारे धोकादायक बोल्डर किंवा दरड हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. बोल्डर स्कॅनिंगचे काम पूर्ण झाले असून दरड हटविण्याचे काम 40 टक्के झाले आहे.
  • नाले स्वच्छ करणे, झरे मोकळे करणे, कचरा हटविण्याबरोबरच कर्जतच्या पुढे खोपोली-लोणावळा तर कसारानंतर इगतपुरी-नाशिक ‘घाट सेक्शन’ येथे धोकादायक बोल्डर हटविण्याची मोहीम सुरू केली आहे.
  • दक्षिणपूर्व घाटात एकूण 28 कि.मी. लांबी भरेल असे एकूण 58 बोगदे तर उत्तरपूर्व घाटात 14 कि.मी.लांबीचे एकूण 18 बोगदे आहेत.

असे होत आहे मायक्रो टनेलिंग

मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्थानकाच्या दरम्यानही ‘मायक्रो टनेलिंग’ केले जात आहे. येथे 1.8 मीटर व्यासाची आणि 400 मीटर लांबीची नवी भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नवा कल्व्हर्ट तयार होऊन रुळांवर तुंबणारे पाणी पी. डिमेलो येथे पालिकेच्या हद्दीत वाहून जाऊन समुद्राला मिळेल आणि रूळ मोकळे राहतील. पालिकेने तरतूद केलेल्या या कामाची अंमलबजावणी रेल्वे करीत आहे. यापूर्वी येथे कल्व्हर्ट नाला नसल्याने मोठा पाऊस पडल्यास पाणी तुंबायचे. आतापर्यंत 250 मीटरपर्यंत पाईप टाकायचे काम पूर्ण झाले असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या