
आंध्र प्रदेशात एका लाईव्ह कार्यक्रमात टीव्हीवरील न्यूज चॅनेल मध्ये दोन नेत्यात शाब्दिक चकमक सुरु असताना भाजप नेत्यावर चप्पल भिरकावण्यात आल्याची घटना समोर आली आहे आंध्र प्रदेशच्या एका तेलगू न्यूज चॅनेलवर सुरू असलेल्या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.
आंध्र प्रदेशसाठी जगन सरकारने तीन राजधान्यांचा प्रस्ताव मांडल्यानंतर अमरावती मध्ये काम बंद करण्यात आले आहे. राजधानीसाठी जवळपास गेल्या 434 दिवसांपासून शेतकरी आणि महिला निदर्शने करीत आहेत. याच विषयावर एका चॅनलवर लाईव्ह चर्चा सुरू होती. या कार्यक्रमात अमरावती विभाग समिती संयुक्त कृती समिती अध्यक्ष डॉक्टर कोलिकापुडी श्रीनिवास राव, भाजपचे राज्य महासचिव विष्णुवर्धन रेड्डी आणि इतर सहभागी झाले होते. या दरम्यान विष्णुवर्धन रेड्डी आणि श्रीनिवास राव या दोघांतील चर्चेचे वादात रूपांतर झाले.
भाजपच्या विष्णुवर्धन रेड्डी यांनी श्रीनिवासराव यांच्यावर टीडीपी सोबत संबंधांचा आरोप केला, तसेच राव यांची थट्टाही केली. यामुळे श्रीनिवासराव संतापले आणि रागाच्या भरात त्यांनी लाईव्ह कार्यक्रमातच भाजपचे नेते रेड्डी यांच्यावर आपली चप्पल भिरकावली. या अनपेक्षित घटनेमुळे लाईव्ह कार्यक्रमात अँकरला तातडीने ब्रेक घ्यावा लागला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतरांनाही या घटनेमुळे धक्का बसला. भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. आंध्र प्रदेश भाजपचे प्रमुख सोमवीर राजू आणि राज्यसभा खासदार जी व्ही नरसिम्हा राव यांनी या घटनेचा निषेध केला आहे तेलगू देसम पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसेल तर चंद्राबाबू नायडू यांनी श्रीनिवास राव यांच्या या कृत्याचा निषेध करावा असे नरसिम्हा राव यांनी म्हटले आहे.




























































