
मध्य प्रदेशातील भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन पुण्याकडे निघालेल्या टेम्पोला संगमनेर तालुका हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात पहाटे अचानक आग लागली. या आगीत सर्व प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल साईप्रसादसमोर आज पहाटे टेम्पोला (एमपी 36 एच 0795) पाठीमागील बाजूने आग लागली. मागच्या बाजूने आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याकडेला उभा केला.
टेम्पोचालक मनीष चौरसिया व त्याच्यासोबत असलेले तेथील मॅनेजर रामविलास राजपूत यांनी टेम्पोतून उडी मारून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. महामार्ग पोलिसांना या घटनेची खबर मिळताच उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच, घारगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील पाटीलदेखील पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर संगमनेर नगरपरिषदेचा अग्निशमन बंब आणि संगमनेर साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने टेम्पोला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले.
टेम्पोला आग लागल्याच्या घटनेने पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी जुन्या चंदनापुरी घाटातून वळविण्यात आली होती. सदरच्या टेम्पोमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका असल्याने आधी या प्रकाराला गंभीर वळण लागले होते. घातपात की अपघात या चर्चेला उधाण आले होते.
टेम्पोला आग लागल्याचे समजताच, आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यापूर्वीच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वकाही ताब्यात घेतले होते. प्रारंभी हा अपघात आहे, अशीच नोंद करण्यात आली आहे. आता पोलीस तपास करतील आणि त्यातून काय निष्पन्न होईल ते कळेलच. टेम्पोमध्ये इयत्ता बारावीचे गोपनीय साहित्य होते. इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षा जाहीर केलेल्या तारखेला पार पडतील, त्यात कोणताही बदल होणार नाही.
– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य परीक्षा मंडळ, पुणे.




























































