
सामना प्रतिनिधी । नगर
किरण जगताप यांच्या हत्या प्रकरणातील दोन फरारी आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुणे जिल्ह्यातून अटक केली आहे. आरोपींमध्ये शेख रियाज उर्फ जहागीरदार (26) आणि शेख अब्दुल रौफ उर्फ जहागीरदार (24, दोघे राहणार जुना बाजार) यांचा समावेश आहे. पुणे बसस्थानकासमोर 29 एप्रिल रोजी येथील 20 वर्षीय किरण जगताप (राहणार रेल्वे स्टेशन) यांना किरकोळ कारणावरुन अनोळखी मुलांनी मारहाण करुन जखमी केले होते. त्याला ठार मारण्याचा प्रयत्नही केला होता. याप्रकरणी त्याचे वडील उद्धव जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मारहाणीत जखमी किरण याचे 4 जून रोजी आनंदऋषी रुग्णालयात निधन झाले. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना पुणे शहरातील कोंढवा परिसरात अटक करुन त्यांना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलिस अधिक्षक दिलीप पवार, निरिक्षक गोकुळ अवताडे, पोलीस सचिन खामगर, भाऊसाहेक काळे, मोहन गाजरे, विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे, बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
























































