
सामना प्रतिनिधी, मालवण
तालुक्यातील गोळवण गावठणवाडी येथे दोन विनापरवाना गावठी बंदुका स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी बंदुका बाळगणाऱ्या अजित मोहन गोळवणकर (वय 29) व शरद राजाराम मांजरेकर (वय 35) या दोघांवर हत्यार अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
गोळवण गावठाणवाडी येथे विना परवाना बंदुका असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक शाहू देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय आंबेरकर, सुभाष खंदारे, गुरुनाथ कोयंडे, आशिष गंगावणे, मनोज राऊत, अनिल धुरी, कृष्णा केसरकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, जयेश सरमळकर, दिव्या राणे, धनश्री परब यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी गोळवण गावठाणवाडीत दोन ठिकाणी छापे मारले.
यात संशयित अजित गोळवणकर याच्याकडे विना परवाना 20 हजार रुपये किंमतीची बंदूक व 480 रुपयाची जीवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर शरद मांजरेकर याच्याकडे गावठी ठासणीची 10 हजार किंमतीची विना परवाना बंदूक सापडून आली. ‘एलसीबी’च्या पथकाने दोन्ही बंदुका हस्तगत करत संशयितांवर हत्यार अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे.


























































