
सामना ऑनलाईन,मुंबई
सिने कलाकारांच्या सिंटा प्रायव्हेट लिमिटेडचे पदाधिकारी असल्याचे भासवून नवोदित कलाकारांची फसवणूक करणाऱ्या दुकलीचा गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने पर्दाफाश केला. अविनाश अरुणकुमार शर्मा आणि विनोद भंडारी अशी या दोघांची नावे आहेत. अविनाश हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तो मुख्य सूत्रधार आहे. या टोळीने आतापर्यंत 70-75 नवकलाकारांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
बनावट करारनामे
आदित्य आणि श्रुती नावाचा वापर करून सिंटाच्या नावाखाली स्टार टीव्हीच्या ‘कृष्णा चली लंडन’ आणि इतर मालिकांमध्ये भूमिका देण्याची बतावणी करून बनावट करारनामे ई-मेलने पाठवून नेट बँकिंग आणि पेटीएमद्वारे रक्कम घेतली जात असायची. रक्कम घेतल्यावर सीरियलमध्ये रोल न देता त्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होता. त्याचा तपास युनिट 9 करत होते.
वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान सोमवारी अविनाशला गोरेगाव परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत विनोदचे नाव समोर आले. अविनाश हा वेब डिझायनर आहे. विनोदच्या मदतीने ते दोघे फसवणूक करू लागले. त्या दोघांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

























































