
दोन संकेतस्थळांच्या माध्यमातून नागरिकांचे नाव अथवा आधारकार्ड नंबरवरून त्यांची गोपनीय माहिती चोरून ती खासगी व्यक्ती किंवा बँक लोन रिकव्हरी एजन्सींना बेकायदेशीरपणे विकणाऱया एका टोळीतल्या दोघा भामटय़ांना गुन्हे शाखा युनिट-6 च्या पथकाने बेडय़ा ठोकल्या आहेत.
निखिल येल्लीगेट्टी नावाचा व्यक्तीने त्याचे अन्य दोन साथीदार मेल्वीन मोदी आणि भावेश मोदी यांच्यासोबतीने ‘ट्रेसनाऊ डॉट को डॉट इन’ आणि ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट फोनीवोटेक डॉट कॉम’ अशा नावाचे दोन संकेतस्थळे विकसित केली आहेत. त्या संकेतस्थळांच्या माध्यमातून ते भामटे कोणत्याही व्यक्तीच्या नावावरून किंवा आधारकार्ड नंबरवरून त्याचा पूर्ण पत्ता, त्याचे अल्टरनेट मोबाईल नंबर, आधार नंबर, घरातील इतर व्यक्तींची नावे, पूर्ण पत्ता, आजूबाजूचे रहिवासी अथवा त्यांच्या गावातील नागरिकांची इत्थंभूत माहिती याशिवाय खासगी आस्थापना, संस्था, कंपनी इत्यादींची खासगी स्वरूपातील संवेदनशील माहिती उपलब्ध करून देतो. तसेच ती माहिती खासगी व्यक्ती अथवा बँक लोन रिकव्हरी करणाऱया एजन्सींना विकतो. या गंभीर बाबीची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने कारवाई करून आरोपींना अटक केली.





























































