
सोशल मिडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारची बदनामी केल्याप्रकरणी कराड पोलिसांत दोनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश ठाकूर (रा. अमरावती) व रणजीतसिंग राणा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक अक्षय शिंदे यांनी तक्रार दिली आहे.
अक्षय शिंदे हे राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचे जिल्हा संघटक आहेत. सोशल माध्यमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारची बदनामी होईल, अशा आशयाच्या पोस्ट व फोटो 12, 15, 16 आणि 19 ऑक्टोबर रोजी टाकण्यात आल्या होत्या. अक्षय यांच्या ते निदर्शनास आले असता, त्यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन कुऱहाडे यांच्याकडून माहिती घेतली. संबंधित सोशल मिडियाचा ग्रुप अमरावतीच्या आकाश ठाकूर (रा. अमरावती) यांनी तयार केल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत अक्षय शिंदे यांनी आकाश ठाकूर व रणजीतसिंग राणा यांच्याविरोधात कराड तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार गणेश कड तपास करीत आहेत.





























































