
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेडचे पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश दिल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांच्या चौकशीनंतर अधीक्षकांनी हे बडतर्फीचे आदेश दिले आहेत. राजरत्न वाघमारे आणि प्रतिभा ढगे असे बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
राजरत्न वाघमारे हा माहूर पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना त्याने ४ फेबु्रवारी २०१६ रोजी एका अल्पवयीन मूलीसोबत असभ्य वर्तन केले होते. या प्रकरणी त्याच्या विरुध्द विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशीच्या अंतिम अहवालात वाघमारे दोषी आढळल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी राजरत्न वाघमारेला शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.
तर दुसरीकडे,पोलीस मुख्यालयात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी प्रतिभा ढगे हीने सेवेत रुजू होताने दिलेल्या आवेदन पत्रात आणि पुढे कार्यालयात दाखल केलेली कागदपत्रांमध्ये तफावत आणि खोटी माहिती दिली होती. या प्रकरणाची देखील चौकशी झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बदल्या केल्या होत्या. मात्र त्याचवेळी तंबी देत, कोणी चुकेल तर त्याला कधीच क्षमा करणार नसल्याचे बजावले होते.त्यामुळे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीतून याचाच प्रत्यय आल्याचं बोललं जातं.



























































