
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर आठवड्यातून दोन दिवस वाहनबंदी लागू करण्यात आली आहे. ही वाहनबंदी आजपासूनच लागू केली आहे. पुलवामामध्ये अलीकडेच लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला. या पार्श्वभूमीवर या हायवेवरून लष्करी वाहनांची वाहतूक निर्धोक व्हावी यासाठी हा निर्णय राज्य प्रशासनाने घेतला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू-कश्मीरात मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षकांना नेण्यात येत असल्याने ही बंदी लागू केल्याचे राज्याच्या प्रशासनाने म्हटले आहे.
बंदी 31 मेपर्यंत
या हायवेवर नागरी वाहनांना दर रविवारी आणि बुधवारी बंदी राहणार आहे. ही बंदी पहाटे 4 ते सायंकाळी 5 पर्यंत ठेवली आहे. ही बंदी येत्या 31 मेपर्यंत राहील हे स्पष्ट करण्यात आले आहे. या हायवेला अनेक छोटे मोठे रस्ते आहेत. या रस्त्यांवरून हायवेवर नागरी वाहने येऊ नयेत यासाठी हायवे आणि हे रस्ते जेथे जोडले गेले आहेत तेथे पोलीस लष्कर आणि सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.
रुग्ण, विद्यार्थी, पर्यटक वाहनांना सूट
या बंदीविरोधात नाराजी व्यक्त झाल्याने या बंदीमधून रुग्ण, विद्यार्थी, पर्यटकांना नेणाऱया वाहनांना वगळण्यात आलेले आहे. संबंधितांची चौकशी करून त्यांना या मार्गावरून वाहनाने जाता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



























































