
सामना ऑनलाईन । डोंबिवली
एकाच सिलिंग फॅनला दोन मैत्रिणींनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीजवळच्या कोळेगाव येथे घडली आहे. ऋतुजा कोल्हे (14) आणि वर्षा पाटील (27) अशी आत्महत्या करणाऱ्या मुलींची नावे आहेत. एकाचवेळी दोन मैत्रिणींनी एकत्र आत्महत्या केली आहे की, हत्या आहे याबाबत मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
डोंबिवलीजवळ असलेल्या कोळेगावातील श्री इमारतीत मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वर्षाच्या घरी ऋतुजा नेहमी रात्री झोपायला येत असे. नेहमीप्रमाणे ऋतुजा आणि तिचा भाऊ सोमवारी रात्री वर्षाच्या घरी झोपले होते. पहाटे पाच वाजता ऋतुजाच्या भावाला जेव्हा जाग आली, तेव्हा स्वयंपाक घरातील सिलिंग फॅनला ऋतुजा आणि वर्षा या दोघींचेही मृतदेह एकाच ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान या दोन्ही मैत्रिणींनी आत्महत्या का केली किंवा त्यांच्या मृत्यूमगे काही कट आहे का याबाबत अधिक तपास सुरु आहे.






























































