दोन जीपच्या धडकेत चार कलावंताह दोन चालक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामखेड येथे दोन जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहा कलावंत जखमी झाले आहेत. यात पाच महिलांचा समावेश आहे. जीप चालकासह एक महिला कलावंत गंभीर जखमी असल्याने तिला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे. ही घटना जामखेड खर्डा रोडवरील आनंदवाडी शिवारात घडली.

जामखेड खर्डा रोडवर शुक्रवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बोलेरो गाडी एम एच 16 ए. टी. 2219 या गाडीचा चालक तैसिफ हसन शेख हा जामखेड शहरातील जगदंबा सांस्कृतिक कला केंद्रातील महिला कलावंतांना घेऊन ईट ता. भुम जिल्हा धाराशिव येथे वरातीची सुपारी घेऊन चालला होता. याच दरम्यान खर्डा गावाजवळील आनंदवाडी शिवारात खर्ड्याकडून जामखेड कडे येत असलेल्या स्कॉर्पिओ एम एच 16 बी. एच. या दोन्ही गाड्याची समोरासमोर धडक झाली या अपघातात कलावंतांच्या गाडीचा चालक तौसिफ शेख यांच्या गुडघ्याला गंभीर जखम झाली तर दिपाली दिलीप जाधव रा. खांडवी ता. जामखेड या देखील गंभीर जखमी झाल्याने या दोघांना नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. इतर जखमी मध्ये रंजना चव्हाण, ललिता जाधव, अंकिता जाधव (रा. सर्व जामखेड) तसेच स्कार्पिओ गाडीचा चालकही जखमी झाला आहे. अंकिता जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी स्कार्पिओ च्या चालकाविरुद्धात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहा हद्दीतील पाच कलाकेंद्र मार्च महिन्यांपासून ग्रामस्थांच्या विरोधामुळे बंद आहेत. यामुळे या कलाकारांवर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. तसेच जामखेड नगरपरिषदेने बुधवार दि. 11 रोजी विशेष सभेचे आयोजन केले आहे. यात विविध विषयांसह जामखेड नगरपरिषद हद्दीतील सहा कलाकेंद्र बंद करण्याबाबत विषय अजिड्यावर घेतलेला असुन जसे मोहा हद्दीतील कलाकेंद्र कायमस्वरूपी बंदचा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला तसाच काहीच्या मते जामखेड हद्दीतील कलाकेंद्रही बंद व्हावेत यावर चर्चा होणार आहे. यामुळे कलाकेंद्र चालक व कलावंतांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर येथीलही कलाकेंद्र बंद झाले तर कलावंतांवर उपासमारीची वेळ येणार आहे.