
निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे वापरत असलेल्या आणखी दोन गाडय़ा एनआयएने आज जप्त केल्या. मर्सिडिज आणि टोयोटा प्राडो अशा त्या दोन गाडय़ा असून आतापर्यंत चार गाडय़ा जप्त केल्या असल्याचे एनआयएच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
एनआयएने ठाण्यातून टोयोटा प्राडो ताब्यात घेतली. तसेच आणखी एक मर्सिडिज कारदेखील ताब्यात घेतली. या दोन्ही गाडय़ा सचिन वाझे हे पोलीस दलात कार्यरत असताना वापरत होते. त्यामुळे तपासकामी त्या गाडय़ा जप्त केल्याचे एनआयएच्या सूत्रांकडून सांगण्यात येते. आतापर्यंत एनआयएने वाझे वापरत होते त्या चार गाडय़ा जप्त केल्या आहेत. त्यात दोन मर्सिडिज, एक टोयोटा प्राडो, एक इनोव्हा गाडीचा समावेश आहे.
दरम्यान, अॅण्टेलिया या स्पह्टकांची स्कॉर्पिओ ठेवल्यानंतर तेथे येऊन गेलेली इनोव्हा कार मुलुंड टोलनाक्यावरून ठाण्याला गेली होती. त्यानंतर थोडाच वेळाने ती इनोव्हा नंबर प्लेट बदलून पुन्हा त्याच मार्गे मुंबईत आली होती. या दोन्ही वेळेस इनोव्हा गाडीचे चालक वेगवेगळे होते, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पैद झाल्याचे एनआयए सूत्रांचे म्हणणे आहे.
तो कुर्ता-पायजमा जाळला
अॅण्टेलियाजवळ एक व्यक्ती पीपीई किट घालून फिरत असताना सीसीटीव्हीत कैद झाली होती. ती व्यक्ती सचिन वाझेच असल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळे तो सीन पुन्हा रिक्रिएट करण्याची आवश्यकता नसल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. तर वाझे यांनी पीपीई किट नाही तर कुर्ता-पायजमा घातला होता असे ही सांगण्यात येते. शिवाय तो कुर्ता-पायजमा वाझे यांनी नंतर जाळून टाकल्याचे एनआयएच्या सूत्रांकडून सांगण्यात येते.






























































