
हिंदुस्थानच्या नौदलाला ‘उदयगिरी’ आणि ‘हिमगिरी’ या दोन युद्धनौका आज मिळाल्या. दोन स्वदेशी युद्धनौकांच्या तैनातीमुळे हिंद नौदलाची ताकद वाढली आहे. नौदलाच्या उदयगिरी आणि हिमगिरी या दोन अत्याधुनिक स्टील्थ प्रकारच्या युद्धनौकांचे जलावतरण मंगळवारी विशाखापट्टणम येथील नौदल तळावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधलेल्या दोन फ्रंटलाइन सर्फेस कॉम्बॅटन्स एकाच वेळी जलावतरण करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही जहाजांमध्ये रचना, शस्त्रे आणि सेन्सर प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून सागरी मोहिमांना सामोरे जाण्यासाठी सक्षम आहेत.
मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये निर्मिती
- आयएनएस हिमगिरी हे कोलकाताच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (जीआरएसई) ने बांधले आहे. त्याचे नाव जुन्या आयएनएस हिमगिरीवरून घेतले आहे. आयएनएस उदयगिरी हे मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधले आहे. आंध्र प्रदेशातील उदयगिरी पर्वतरांगेवरून त्याचे नाव देण्यात आले आहे, जी फक्त 37 महिन्यांत बांधण्यात आली. या युद्धनौका देशाच्या वाढत्या जहाज बांधणी कौशल्याचे उदाहरण आहे.
- या युद्धनौका दुश्मनच्या रडार, इफ्रारेड आणि ध्वनी सेन्सर्सपासून वाचण्यासाठी डिझाइन केलेल्या आहेत, ज्यामुळे त्यांना शोधणे कठीण होते.
- ही जहाजे पारंपरिक आणि अपारंपरिक सागरी धोके हाताळण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे हिंदुस्थानी नौदलाची युद्धक्षमता वाढते.
- युद्धनौका प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत तयार केली गेली आहेत, जी शिवालिक वर्गाच्या जहाजांनंतरची प्रगत फ्रिगेट्स आहेत.
- प्रत्येक फ्रिगेटचे वजन सुमारे 6,700 टन आहे, जे मागील वर्गाच्या जहाजांपेक्षा सुमारे 5 टक्के मोठे आहे. त्यांचा वेग ताशी 52 किमी आहे. एकदा इंजिन भरल्यानंतर 10 हजार किमीपेक्षा जास्त अंतर कापू शकतात.
- युद्धनौका आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत, जी सागरी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावतात. सी किंग हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकतात.