अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षकांना एसपींचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

वारंवार सुचना देऊनही बेकायदेशीर धंद्यावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल्या 2 पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द अढाव व पारोळ्याचे पोलीस निरिक्षक विलास सोनवणे यांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे आदेश आज सायंकाळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी काढले. यामुळे पोलीस दलात देखील खळबळ उडाली आहे.

औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अढाव यांची जळगाव जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली असून पारोळा येथील विलास सोनवणे यांची जळगाव येथे मानव संसाधन विभागात बदली केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आस्थापना मंडळाच्या सदस्यांनी पाहणी करुन अहवाल तयार केला होता. यात पोलीस निरिक्षक अनिरुध्द आढाव यांनी अधीक्षकांच्या आदेशाला खो देत  बेक्यादेशीर धंद्याविरोधात एकही कारवाई केली नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. वाढत्या तक्रारी व स्थानिक गुन्हे शाखेचे छापा टाकून बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरु असल्याबाबत स्पष्ट झाले होते.

एमआयडीसीला शिरसाठ तर पारोळा सचिन सानप

जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक रणजित शिरसाठ यांची एमआयडीसीला आढाव यांच्या जागी वर्णी लागली. तर पारोळा पोलीस ठाण्यात पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन सिताराम सानप यांची प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे.