जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी कैसर कोकासह दोन ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांना सोमवारी जोरदार चकमक उडाली. या चकमकीमध्ये दोन दहशतावाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कुख्यात दहशतवादी कैसर कोका यालाही ठार मारण्यात जवानांना यश आले आहे.

अवंतीपोरामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

चकमकीनंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरुच आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून यूएसए निर्मित रायफल, कार्बाइन, पिस्तूल आणि आपत्तीजनक सामानासह दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

जम्मू-कश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. कैसर कोका असे यातील एका दहशतवाद्याचे नाव असून तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. कश्मीर खोऱ्यामध्ये 2018 पासून तो सक्रिय होता. कश्मीरी तरुणांची दहशतवादी संघटनेमध्ये भरती करण्याचे काम त्याच्याकडे होते.