रत्नागिरीत हेल्मेट वापराबाबत सक्ती नाही; प्रबोधन करणार – उदय सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली दोन वर्षे रत्नागिरीत असलेल्या हेल्मेट सक्तीपासून नागरीकांना मुक्ती मिळाली आहे. हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा नागरीकांमध्ये हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अन्य शहरांमध्ये हेल्मेटसक्ती रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. माळनाका येथील शासकीय विश्रामगृहात उदय सामंत यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

रत्नागिरी शहरातील हेल्मेटसक्तीबाबत एक बैठक झाली. या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात जशी हेल्मेटसक्ती न करता प्रबोधनावर भर दिला आहे. त्याप्रमाणे रत्नागिरीमध्येही नागरीकांमध्ये हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करा. हेल्मेट सक्ती करु नका, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या होत्या. त्यानंतर रविवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक परिपत्रक जाहीर करून हेल्मेटबाबत प्रबोधनाबाबत उपक्रम सुरु करण्याचे हाती घेतले आहे. त्यामुळे हेल्मेट वापरले नाही म्हणून दंडात्मक कारवाईतून नागरीकांची सुटका झाली आहे.
या निर्णयामुळे सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ढोल व ताशाच्या गजरात शासकीय विश्रामगृहात स्वागत करण्यात आले. हेल्मेट सक्तीचा निर्णय रद्द केल्याबददल नागरीकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, पुण्यात अशी हेल्मेटसक्ती न करता हेल्मेट वापराबाबत प्रबोधन केले जात आहे. तसेच प्रबोधन रत्नागिरीत करा. हेल्मेटबाबत सक्ती करु नका अशा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच प्रशासनानेही हेल्मेटवापराबाबत निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रक जाहीर केले आहे. मी सर्व नागरीकांच्या वतीने प्रशासनाला धन्यवाद देतो. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. ज्यांना हेल्मेट वापरायचे आहे त्यांनी ते जरूर वापरावे असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच तरुणांनी धूमस्टाईलने वाहन चालवू नये. त्यामुळे समोरच्याला आणि आपल्यालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहन काळजीपूर्व चालवा अशी विनंतीही त्यांनी केली.