
मुंबई विद्यापीठाच्या मरिन लाईन्स येथील स्पोर्टस् पॅव्हेलियनची झालेली दुरवस्था युवा सेनेने समोर आणल्यानंतर याची गंभीर दखल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. या स्पोटर्स पॅव्हेलियनाचा लवकरच कायापालट करणार असून याठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून लवकरच याबाबत बैठक घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट्स पॅव्हेलियनमधून विद्यार्थ्यांच्या ट्रॉफी चोरीला गेल्याचे वृत्त दै. सामनाने प्रकाशात आणल्यानंतर नुकतेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी व युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, राजन कोळंबेकर, निखिल जाधव, कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सामंत म्हणाले, आज मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट पॅव्हेलियनला भेट देऊन तेथील विकासात्मक कामांची पाहणी केली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या पॅव्हेलियनचा किकास होणे आवश्यक असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याला चालना मिळू शकेल. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी हे महत्वपूर्ण आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.


























































