
‘गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे अभिनंदन केले.गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधानसभेचे निकाल लागले व तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. तर दिल्ली ‘मनपा’ निवडणुकीत ‘आप’ने भाजपवर मात केली. याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व आपचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
गुजरात विजयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते.’ उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, ‘पंतप्रधान मोदी हे 11 तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील ही अपेक्षा. आपने गुजरातेत मोठय़ा प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे स्पष्टही झाले. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते.’
गुजरातच्या जनतेने रेकॉर्डचा रेकॉर्ड मोडला!
गुजरातच्या जनतेसमोर नतमस्तक आहे. गुजरातच्या जनतेने रेकॉर्डचा रेकॉर्ड मोडून भाजपने नवा इतिहास रचला आहे. जात, पात, धर्म सोडून जनतेने भाजपला मतदान केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
कठोर परिश्रम करू, लढत राहू!
देशाच्या आदर्शासाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही पुनर्बांधणी करू, कठोर परिश्रम करू आणि लढत राहू’ अशा शब्दात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी गुजरातच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली.




























































