शेतकऱ्यांना पिडाल तर मी सरकारच्या विरोधात उभा राहीन! उद्धव ठाकरेंचा आसूड कडाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बीड

अन्नदात्याला फसवलं जातं, पात्र ठरलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीचं सर्टिफिकेट मिळतं मात्र कर्जमाफी होत नाही. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना पिडाल तर मी सरकारच्या विरोधात उभा राहीन असं उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये ठणकावून सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीडमध्ये आलेल्या उद्धव ठाकरे यांचा आसूड आज जबरदस्त कडाडला. कर्जमाफीमध्ये घोटाळा झाल्याचे आत्तापर्यंत आरोप होत होते. उद्धव ठाकरे यांनी फसवणूक झालेला शेतकरीच आज पुरावा म्हणून तमाम जनतेसमोर उभा केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पशुखाद्य तसेच पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर बीडमधल्या आशीर्वाद लॉन्स इथल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रश्न विचारला ‘खरं सांगा की किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे’किती जणांना मिळाला असा प्रश्न विचारला. एकाही शेतकऱ्याचा हात वर होत नाही असं पाहून ते म्हणाले की मी तुम्हाला कर्जमाफीचं सर्टीफिकेट मिळालेला शेतकरी दाखवतो. यावेळी मंचावर अंजनडोह इथल्या बाळासाहेब सोळुंके या शेतकऱ्याला पुढे आणण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी सोळुंके यांना मिळालेला सर्टीफिकेट दाखवलं. उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्यालाच प्रश्न विचारला की सर्टीफिकेट मिळालं पण कर्जमाफी झाली का ? यावर त्या शेतकऱ्याचं उत्तर नाही असं होतं. त्याचं उत्तर संपल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की “या अन्नदात्याला तुम्ही अशा पद्धतीने खोटं बोलून फसवताय ? खोट्या कर्जमाफीचे आकडे आमच्या तोंडावर फेकून तुम्ही आम्हाला सांगताय की कर्जमाफी झालीय म्हणून. का झाली नाही या शेतकऱ्याची कर्जमाफी ? अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलं. सोळुंके पात्र ठरूनही त्यांची कर्जमाफी होत नाही. हे जर मी चिडून सरकारला जाब विचारला तर तुम्ही मला विचारणार की मी सरकारच्या विरोधात आहे? माझ्या शेतकऱ्याला पिडाल तर मी सरकारच्या विरोधात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही”

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली, मात्र त्याचा खरोखर जनतेला फायदा झाला का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारला विचारला. “देश बदल रहा है म्हणता हे तुमच्यासाठी ठीक आहे कारण तुम्ही रोज नवनव्या देशात जात असता त्यामुळे तुम्हाला वाटतं की देश बदल रहा है. तुमच्यासाठी देश बदलतोय मात्र माझ्या देशातील बांधवांची परिस्थिती बदलत नाहीये, त्यांचे राहणीमान, दु:ख, व्यथा,वेदना बदलत नाहीयेत.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्रीय पथक आहे का लेझिम पथक
केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यानंतर राज्यात दुष्काल जाहीर करण्यात आला. मात्र अजूनही दुष्काळाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळत नाहीये. उद्धव ठाकरे याबाबत बोलताना म्हणाले की “केंद्रीय पथक येऊन गेलं एक दीड-महिना झाला तुमच्या हातामध्ये काही पडलं ? हातात आली का मदत ? मग पथकाने केलं काय ? काय लेझिम पथक होतं का बेंजो पथक होतं ?

मी मराठवाड्यात पुन्हा येणार
या काळात मराठवाड्याला दिलेली ही पहिली भेट नसून आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुन्हा मराठवाड्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. “मी शिवसेनेच्या सगळा मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांना घेऊन फिरतोय तो सरकारी यंत्रणेचा सुस्त पडलेला अजगर ढोसण्यासाठी फिरतोय. या यंत्रणेला तुमच्या सुखदु:खाशी काही देणंघेणं नाहीये.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमचे दिवस राहिलेत तरी किती?
एकामागोमाग एक घो,णा करणाऱ्या भाजप सरकारवर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की “युतीची जी चर्चा पेपरमधून सुरू आहे, आमच्याकडे नाही. पंढरपूरच्या सभेत मी चिडून बोललो होतो की युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतकऱ्याचे काय कारता ते बोला. नुसत्या घोषणा करून चालत नाही. किती पाहिजे महाराष्ट्राला १० हजार कोटी…दिले..पण ते मिळणार कधी? तुमचे दिवस राहिलेत तरी किती? दिवस नाही शिल्लक आणि घोषणा करून काय होणार ? घोषणा करून शेतकऱ्याचे पीक पुन्हा तरारून उभं राहणार नाही.”

मग राम मंदिराचा मुद्दा तुमच्या जाहिरनाम्यात कशाला ?
“गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आमचा उपयोग करून घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत असं मी मागेच सांगितलं होतं. गेली साडेचार वर्ष आपण त्यांची साथसोबत केली. मात्र ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न  सोडवू शकलात ना राम मंदिराचा विषय. राम हा एका प्रदेशाचा देव नाही, तो आपल्या सगळ्यांचा देव आहे. सराकर बदलल्यानंतर राम मंदिर होईल असं वाटलं होतं. मात्र पंतप्रधान म्हणतात की न्यायालय जे काही करेल ते. जर न्यायालयच निर्णय घेणार होतं तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात हा प्रश्न सोडवू म्हणून का सांगितलंत ? म्हणूनच मी घोषणा दिली आहे की हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार.” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले

अच्छे दिन नाही आता अच्छे वर्ष हवे आहे
उद्धव ठाकरे यांनी नव्या वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देताना आता अच्छे दिन नाही तर अच्छे वर्ष येऊद्या अशी प्रार्थना केली. चांगलं वर्ष यावं यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल आणि त्यासाठी आपला कोण आणि थापाड्या कोण हे ओळखता आलं पाहीजे असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं. सत्तेच्या झुलीसाठी मी णाणुसकी विसरणार नाही असं आश्वासन देतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की “तुमच्या मनातील व्यथा मी बोलतोय, या तुम्ही बोलल्या पाहिजेत.  आपली ही मनकी बात नाहीये, मी जनकी बात करतोय”

फसल योजना नाही, फसाल योजना
कृषीतज्ज्ञ पी.साईनाथ यांनी आरोप केला आहे की पीकविमा योजनेतील घोटाळा हा राफेलच्या बरोबरीचा घोटाळा आहे. त्यामुळे ‘प्रधानमंत्री फसल योजना, म्हणजे फसाल योजना आहे असं साईनाथ यांचं म्हणणं आहे’  असं उद्धव ठाकरे म्हणाले.  “पंपाला वीज नाही, गुरांना चारा नाही, शेतीला आणि प्यायला पाणी नाही, महिलांना सुरक्षा नाही, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलिंडरचाही पत्ता नाही, पीकविमा योजनेचे हप्ते भरले तरी नुकसानभरपाई नाही मिळत मग हे सरकार करायचंय काय ?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

लवकरच जनावरांसाठी पाण्याचे हौद देणार
गोठ्यात बांधलेली गाय किंवा बैल हा आपल्या कुटुंबातील एक सदस्य असतो. आपल्याला खायला मिळालं नाही तरी चालेल मात्र गोमातेला,बैलाला खायला मिळालं पाहीजे असं म्हणून उपाशी राहणारे शेतकरी मी बघितले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. यामुळेच या जनावरांचे दुष्काळात पाण्यावाचून हाल होू नये म्हणून शिवसेना त्यांच्यासाठी हौदाची व्यवस्था करणार असल्याचं ठाकरे म्हणाले.

मी एक दुष्काळ हटवतो तुम्ही दुसरा दुष्काळ हटवा
दुष्काळ गंभीर तिथे शिवसेना खंबीर असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मनात आपल्या पाठीशी शिवसेना उभी असल्याचा आत्मविश्वास निर्माण केला. बीड जिल्ह्यात शिवसेनेसाठी राजकीय दुष्काळ आहे. तुमच्या आयुष्यातील हा दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर इथला शिवसेनेचा राजकीय दुष्काळही तुम्हालाच हटवावा लागेल. एक दुष्काळ मी हटवतो, दुसरा दुष्काळ तुम्ही हटवा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.