मराठी व गुजराती दुधात साखरेसारखे विरघळून गेले! मुंबई समाचार द्विशताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र 200 वर्षं पूर्ण करत आहे. हेच तर आपलं प्रेम आहे, मराठी आणि गुजराती हे दोघेही दुधात साखरेसारखे एकमेकात विरघळून गेले आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काढले.

दै. ‘मुंबई समाचार’च्या द्विशताब्दीनिमित्ताने आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 1822पासून सुरू झालेले ‘मुंबई समाचार’ जगातील आणि देशातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे.

इतिहासाचे साक्षीदार

काही वृत्तपत्रे ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत असे ते म्हणाले. मीदेखील ‘सामना’ वृत्तपत्र चालवतो. वृत्तपत्र चालवणं कठीण असतं. वृत्तपत्रात कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणं, पत्रकारांचे कर्तव्य असतं आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

देशातील दैनिकांची गौरवास्पद कामगिरी

या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत कोरोना काळात ज्या प्रकारे सर्वच भाषेच्या दैनिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत काम केले ते नेहमीच स्मरणात राहील. हिंदुस्थानातील प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच हिंदुस्थानला शंभर वर्षांतील मोठय़ा आपत्तीला तोंड देण्यास मदत झाली. येणाऱया काळातही वृत्तपत्र आणि पत्रकारांकडून सकारात्मक पत्रकारिता दिसेल, अशी अपेक्षा या वेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.