
कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकत काय असते याचे उदाहरण आहे. असो, आता सरकारला उपरती झाली आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने केली त्याचे मी प्रथम तर स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी कायदे रद्द करण्याबाबत पेंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचे वातावरण होते. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत, पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली. त्यांना माझे त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्ताने नम्र अभिवादन करतो.
विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन देशहिताचे निर्णय घ्यायला हवेत
महाविकास आघाडीने या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचे वारंवार सांगितले आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळातदेखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. पेंद्राने यापुढे असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवा, म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असे होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.





























































