कोण होतास तू! काय झालास तू…भ्रष्टाचाऱयांना पांघरुणात घेतलंस तू!! उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर हल्ला, अमित शहांवर जबरदस्त प्रहार

भाजपचे वंदे मातरम् हे ‘वन डे मातरम’ आहे, म्हणजेच फक्त एका दिवसासाठी आहे. कारण बाकीच्या वेळी त्यांना त्याचे काहीच पडलेले नसते. वंदे मातरम् म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचे लक्ष नाही. वंदे मातरम्वरील चर्चा संघाचे कपडे उतरवण्यासाठीच घेतली आहे का अशी शंका येते.

‘कोण होतास तू, काय झालास तू’ अशी ‘एक्स’ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाची क्लिप होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार हल्ला चढवला. फडणवीस हे मुख्यमंत्री नव्हे पांघरूण मंत्री आहेत, भ्रष्टाचाऱयांना पांघरूण घालण्याचे काम ते करत असतात, अशी टीका करत, ‘कोण होतास तू, काय झालास तू… भ्रष्टाचाऱयांना पांघरुणात घेतलंस तू,’ असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या कामकाजात भाग घेतला. त्यानंतर विधान भवनातील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जशास तसे उत्तर दिले. महायुतीचे सरकार फक्त निवडणुकांसाठी काम करत आहे. मंत्र्यांचे भ्रष्टाचार रोजच्या रोज चव्हाटय़ावर येत आहेत, व्हिडीओ आणि फोटो बाहेर येत आहेत तरीही मुख्यमंत्री ढिम्म आहेत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आता नवीन ‘पांघरूण खाते’ बनवावे म्हणजे बाकीचे मंत्री पांघरूण पाहून हात-पाय पसरतील, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

शेतकऱयांचे मदत पॅकेज, निवडणुकांमधील गैरप्रकार, भ्रष्टाचार, हिंदुत्व, गोमांस आदी मुद्दय़ावरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारसह भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. नागपूरला अधिवेशन विदर्भासाठी घेतले जाते पण विदर्भाला नेमके काय दिले, असा सवाल उपस्थित करतानाच त्यांनी शेतकऱयांच्या मदत पॅकेजवरून महायुती सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे मराठवाडय़ात शेतकऱयांची शेते, घरेदारे बुडाली. विद्यार्थ्यांची वह्या–पुस्तके वाहून गेली. पिके सडली. शेतजमिनीवरची मातीच खरडून गेली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भले मोठे पॅकेज असा गोंडस शब्द देऊन एक रक्कम जाहीर केली. त्या पॅकेजचे पुढे काय झाले? किती पैसे शेतकऱयांना दिले गेले हे कळायला मार्ग नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-आमदार अनिल परब, शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू, गटनेते भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर, अजय चौधरी, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

शेतकऱयांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचे ठिबक सिंचन झाले का?

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करत पॅकेज जाहीर केले, परंतु अद्याप शेतकऱयांना पुरेशी मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजचे ठिबक सिंचन झाले का, असा भीमटोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.

…तेव्हा भाजपचे हिंदुत्व मेले होते का?

उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखाच फाडला. ते म्हणाले की, दिल्लीत संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडले गेले अशी बातमी आली होती. संघाच्या कार्यालयासाठी मंदिर पाडले, भाजपवाले हे कृत्य करतात? पालघरमधील साधूंच्या हत्याकांडावरून महायुती सरकारला बदनाम केले गेले होते आणि त्या हत्याकांडातील व्यक्तीलाच भाजपने पक्षात घेतले. त्यावेळी भाजपचे हिंदुत्व मेले होते का? लाज वाटली पाहिजे अमित शहा आणि भाजपला ज्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर शंका घेतली, तुमच्या बुडाखाली काय आहे ते आधी पाहा, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करणारच

लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करणाऱया मंत्र्यांना घरी बसावे लागेल असा दम मुख्यमंत्री फडणवीस यांनी भरला आहे. त्यावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी, मी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करणारच असे ठामपणे सांगितले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते, ते नाही दिले तर फडणवीसांनाच घरी बसावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदुस्थानमध्ये अतिरेकी कारवाया करणाऱया पाकिस्तानबरोबर अमित शहांचा मुलगा जय शहा क्रिकेट खेळतो तेव्हा त्यांचे हिंदुत्व कोणत्या टोपीखाली दडते? जय शहा ऐकत नसेल तर मी हिंदुत्ववादी आहे, पण जय शहा हिंदुत्ववादी नाही असे अमित शहा यांनी जाहीर करावे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय म्हणून त्याला क्रिकेट बोर्डाचा राजीनामा तरी द्यायला लावा, नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारायला लावा.

मुंबईला भडकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू

ऍनाकोंडा मुंबई गिळण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर शरसंधान केले. अरुणाचलमध्ये चीन जसे अतिक्रमण करतोय तसे महाराष्ट्रातल्या गावावर आता गुजरात दावा करतोय. मुंबईला भडकावण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. पण तो प्रयत्न शिवसेना हाणून पाडेल, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

केंद्राला पाठवलेला प्रस्ताव विधिमंडळाच्या पटलावर ठेवा

महाराष्ट्राकडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे गेल्या महिनाअखेरीस केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेत सांगून महायुती सरकारचे बिंग फोडले होते. त्यानंतर घाईघाईने प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असे सरकारने सांगितले. तो प्रस्ताव सरकारने विधिमंडळाच्या पटलावर ठेवावा, राज्य सरकार नेमकी कशी मदत आणणार आहे ते जनतेला समजायला हवे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. केंद्रात डबल इंजिन सरकार आहे, नुसती ढकलपंची करणार आहेत की थेट मदत आणणार आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते पद नाही तर असंवैधानिक उपमुख्यमंत्री पद रद्द करा

शिवसेनेने विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करूनही विरोधी पक्षनेता नेमलेला नाही. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. सरकारकडे 200 हून अधिक जागा आहेत, केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे मग विरोधी पक्षनेते पद द्यायला का घाबरता. असंवैधानिक असलेल्या उपमुख्यमंत्री पदावर दोन-दोन माणसे नेमली जातात, संख्येचे कारण दाखवून विरोधी पक्षनेते पद द्यायचे नसेल तर असंवैधानिक उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, असे ते म्हणाले. शेवटी नंबर एकलाच महत्त्व आहे असे भाजपवालेच सांगतात, मग बिन नंबराचे मंत्री ठेवताच कामा नये, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हिंमत असेल तर गोमांस खाणाऱया मंत्र्याला हाकला

उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि केंद्रीय मंत्री किरण रिजीजू हे दोघे जेवण करत असल्याचा फोटो दाखवला. ते म्हणाले की, याच रिजीजू यांनी ते गोमांस खातात असे जाहीररीत्या सांगितले होते आणि कोण मला अडवतो असेही म्हटले होते. फोटोमध्ये त्यांच्या ताटात नेमके काय आहे कोणाला माहीत असे म्हणत, शहा यांना शिवसेनेच्या हिंदुत्वावर शंका घ्यायची असेल आणि हिंमत असेल तर पहिले रिजीजू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

शहा, भाजप आणि संघाने शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याच्या फंदात पडू नये

उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर जबरदस्त प्रहार केला. अमित शहा यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये आणि त्यांच्या भाजपने आणि संघानेदेखील या फंदात पडू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजपच्या मुस्लिमप्रेमाचा पाढाच यावेळी उद्धव ठाकरे यांनी वाचला. ते म्हणाले की, जीनांच्या थडग्यावर कोणी माथा टेकवला, नवाज शरीफांचा केक कोणी खाल्ला होता इथपर्यंत भाजपच्या बऱयाच गोष्टी आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मुस्लिम लीगबरोबर कसे साटेलोटे होते. त्यांनी बंगालच्या चळवळीत चले जावला कसा विरोध केला होता. फझलूल हकबरोबर बंगालच्या सरकारमध्ये भाजप ज्यांना देव मानते ते श्यामाप्रसाद मुखर्जी देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते. तीन ठिकाणी त्यांचे मुस्लिम लीगसोबत सरकार होते, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.