कंत्राटदारांच्या सरकारला रोखण्याची हिंमत फक्त शिवसेनेतच – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हे कंत्राटदारांच सरकार आहे. कंत्राटदारांसाठी काम करतयं आणि कंत्राटदाऱ्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी म्हणून डावपेच सुरु आहेत. विरोध करायला शिवसेना नको म्हणून शिवसेना नष्ट करायची, असं यांना वाटतंय. कारण महाराष्ट्रामध्ये जर यांना कोणी रोखू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त शिवसेनाच. दुसऱ्या कोणाचीही हिंमत नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. दादर येथे झालेल्या ज्येष्ठ शिवसैनिक संमेलनात ते बोलत होते.

ज्येष्ठ शिवसैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना प्रमुख नेहमी आपल्याला सांगायचे की त्यांना जे त्यांना माझे आजोबा सांगायचे की वय वाढत असत पण ज्या क्षणी मन थकेल त्या क्षणी तो माणूस वृद्ध होतो. आणि तुम्ही तर सगळे युवा सैनिक आहात. कारण आजचा जो हा उत्साह आहे तो काही दसरा मेळाव्य़ापेक्षा कमी नाही. आताच आपल्या साहेबांच एक पुस्तक ‘फोटोबायोग्राफी हे पुस्तक जेष्ठ कक्षेसाठी दिलं. सहज चाळायला म्हणून ठीक आहे पण त्या पुस्तकातील पानं तुम्ही आहात. कारण जर तुम्ही साथ दिली नसती तर ते कागदी पुस्तक वेगळं पण शिवसेना नावाचा जो ग्रंथ जो अजूनही लिहिला जातोय हा कधीच थांबला असता. तुम्ही सर्व सुरुवातीपासूनचे शिवसैनिक. मला आज आनंद वाटला की जुने सगळे शिवसैनिक नव्या दमाने आज मला भेटतायत. कारण आमचं लहानपण हे सगळ तुमच्या सोबतच गेलय आणि तोच दरारा आजसुद्धा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संकटाला संधी मानूनच पुढे जायचं, हा निर्धार व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे संकट नाही ही एक संधी आहे असं मी मानतो. देव पुन्हा पुन्हा संधी देत नसतो. माझ म्हणणं असं आहे की शिवसेनेला संपवायला हे सगळे उभे आहेत. त्यात आणखी कोणाला जायचय त्यांनी जा. कारण उद्या शिवसेना जिंकल्यानंतर की तू जिंकलास पण मी नव्हतो त्यांच्यात, असं कुणीतरी म्हणेल. त्यापेक्षा सगळ्यानांच साफ करतो आणि मग शिवसेना काय आहे ते दाखवतो. कारण संकटाला आपण कधी संकट मानायचं नाही. संकट ही एक संधी आहे. ज्या शिवसेनेच्या ताकदीमुळे तुम्ही मोठो झालात ती ताकदच तुम्हाला अजून कळलेली नाही. तुम्ही फक्त वरवरचा फेस घेऊन गेलात. वर आलेली फुलं कदाचित तुम्ही तोडली असतील पण मुळं माझी अजूनही घट्ट आहेत. आणि जोपर्यंत ती घट्ट आहेत कोणीही मुळावर येउदे त्यांचे एक घाव दोन तुकडे करायला आम्ही समर्थ आहोत, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरवेळी संकट आलं की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. तशीच दिशा 1987 साली शिवसेना प्रमुखांनी देशाला दाखवली ती हिंदुत्वाची दिशा. तुमच्या आयुष्याच्या काळात जे वातावरण मुंबईमध्ये होतं, मराठी माणसाला कुणी विचारत नव्हतं तोच मान सन्मान या मुंबईमध्ये मराठी माणसाला मिळवून दिला तो म्हणजे या शिवसैनिकांनी, तुम्ही सगळ्यांनी आणि आता तिच परिस्थिती पुन्हा उद्भवते. आपल्या मुंबईला पुन्हा एकदा लाचार केल जातय हे कसं काय आपण सहन करू शकतो. या माझ्या म्हणजेच आपल्या मुंबईची पिळवणूक करतात. काही दिवसांपूर्वी आपण मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे, आपण असं अभिमानाने सांगत होतो. आज आता ते स्थान राहिलंय की नाही याचा शोध घ्यावा लागेल. आज हे दोघेजण वरती बसलेले हे सगळ अहमदाबादला सुरतला घेऊन जातात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

‘हे कंत्राटदारांच सरकार आहे. कंत्राटदारांसाठी काम करतयं आणि कंत्राटदाऱ्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी म्हणून डावपेच सुरु आहेत. विरोध करायला शिवसेना नको म्हणून शिवसेना नष्ट करायची, असं यांना वाटतंय. कारण महाराष्ट्रामध्ये जर यांना कोणी रोखू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त शिवसेनाच. दुसऱ्या कोणाचीही हिंमत नाही, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.