विरार-वसईतील गुंडगिरी मोडून काढणारच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वसई

विरार-वसईत गेल्या अनेक वर्षांपासून गुंडगिरी सुरू आहे. इथे पर स्क्वेअर फुटाचा हिशेब चालतो. पाण्यासाठी पैसे देऊनही ते मिळत नाही. वसईकरांनो, तुम्ही कुणाचे गुलाम नाही. गुंडांचा कर्दनकाळ असलेले सरकार महाराष्ट्रात व केंद्रात आहे. तुमच्यावर कोणी गुंडागर्दी करत असेल तर गल्लीबोळातल्या गुंडांची मुजोरी सरकार म्हणून आम्ही मोडून काढू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांचा मंगळवारी पालघर जिह्यात झंझावाती दौरा झाला. यावेळी वसईत त्यांनी वसई-विरारमधील  गुंडगिरीचा समाचार घेतला.

श्रीनिवास वनगांना विधानसभेत पाठवणारच!
पालघरची जागा आम्ही श्रीनिवास वनगा यांच्यासाठीच हट्टाने आणि आग्रहाने मागून घेतली होती. पण माझ्याकडे मनोगत व्यक्त करताना श्रीनिवास म्हणाला, मला माझ्या बाबांसारखं काम करायचं आहे. त्यासाठी इतकी मोठी झेप घेण्याआधी मी आधी अनुभव घेतो. श्रीनिवासने असे सांगितल्यानंतर लोकसभेच्या उमेदवारांचा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की, इतर कोणाला उमेदवारी देण्यापेक्षा अनुभवसंपन्न उमेदवार युतीकडे आहेत ते म्हणजे राजेंद्र गावित. मग मुख्यमंत्र्यांशी बोलून गावित यांना उमेदवारी दिली. यांची निशाणी धनुष्यबाण आहे. पक्षाचा विचार करणाऱ्या श्रीनिवास वनगा यांच्या पाठीशी शिवसेना सदैव उभी राहील आणि त्याला विधानसभेत पाठवणारच, असे वचनच उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले.

देशद्रोह्यांना फासावरच लटकवा!
देशाशी जो द्रोह करेल त्याला देशद्रोही म्हणून फासावर लटकवले पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. तीच सर्वसामान्य देशप्रेमी जनतेची भावना आहे. जो पक्ष आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढून टाकू, असे म्हणतो त्याला निवडणूक लढवण्यापासून दूर केले पाहिजे, असे ठाकरी तडाखेही उद्धव ठाकरे यांनी लगावले. अशा अनेक गोष्टी निवडणुकीच्या काळात बोलल्या जातात हे मी समजू शकतो. पण ते बोलत असताना देशाच्या एकात्मतेला बट्टा लागता कामा नये. याचं भान राज्यकर्ता म्हणून स्वतःला समजत असणाऱ्या पक्षाला असलंच पाहिजे आणि काँग्रेसने नेमके तेच गमावले आहे.

यावेळी शिवसेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पालघर जिल्हा संघटक श्रीनिवास वनगा, युतीचे उमेदवार राजेंद्र गावीत, आमदार पास्कल धनारे, आमदार अमित घोडा, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण,उपजिल्हाप्रमुख नीलेश तेंडोलकर, संतोष शेट्टी, महिला विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, विनायक निकम, युवा सेनेचे पालघर जिल्हा विस्तारक राहुल लोंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष साटम, उपाध्यक्ष मनोज पाटील, महामंत्री राजन नाईक, हरेंद्र पाटील यांच्यासह शिवसेना -भाजप, आरपीआय, दलित पॅन्थर आणि श्रमजीवी संघटनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आगरी सेनेचा महायुतीला पाठिंबा
आगरी सेनेचे पालघर अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी शिवसेना- भाजप युतीचे राजेंद गावीत यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे पालघर जिह्यातून आगरी समाजाची चाळीस हजारांहून अधिक मते युतीला मिळणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी चंदनसार येथील कार्यालयात त्यांची भेट घेतली. गुरुद्वारा तसेच रमेदी दत्तमंदिर येथे जाऊन उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. बसिन कॅथलिक बॅकेच्या मुख्यालयात उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

आर्च बिशप यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद
उद्धव ठाकरे यांनी बिशप हाऊस येथे जाऊन आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मच्याडो यांची भेट घेतली. यावेळी आर्च बिशप यांनी देशाचे कल्याण करा असे सांगत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना विजयासाठी आशीर्वाद दिले. आर्च बिशप यांनी उद्धव ठाकरे यांना धार्मिक ग्रंथही भेट म्हणून दिले. यावेळी आर्च बिशप आणि उद्धव ठाकरे यांच्यात पंधरा मिनिटे चर्चाही झाली.

वसईच्या 29 गावांचा प्रश्न सोडवणारच
ठिकठिकाणी झालेल्या संवादसभेत उपस्थितांनी 29 गावांचा प्रश्न सोडवा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली तेव्हा ते म्हणाले, हा प्रश्न शिवसेना-भाजपचे सरकार हा प्रश्न सोडवणारच हे माझे वचन आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, 29 गावांचे वेगळे कौन्सिल बसले पाहिजे ही युती सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सरकारने ऑफिडेव्हिट दिले आहे. त्यावर 9 तारखेला सुनावणी होणार आहे. यावेळी सरकार वसईकरांची भूमिका अत्यंत मजबुतीने मांडेल.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसई किल्ल्यात जाऊन नरवीर चिमाजी आप्पा यांच्या स्मारकाला वंदन केले. त्यांचा पुणेरी पगडी घालून गौरव करण्यात आला तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ उंचावून उपस्थितांना अभिवादन केले.