महिलांविषयक अभ्यासक्रमांसाठी दहा हजार संस्थांना निधी देणार, यूजीसीची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

महिला सक्षमीकरणासाठी विविध अभ्यासक्रम सुरू करावेत यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) देशातील दहा हजार महाविद्यालये आणि विद्यापीठांना निधी देणार आहे. महाविद्यालयांना दरवर्षी प्रत्येकी 25 लाख रुपये तर विद्यापीठांना प्रत्येकी 35 लाख रुपये दिले जाणार आहेत. समाज आणि अर्थव्यवस्थेत महिलांचा पुढाकार वाढावा यासाठी सहाय्यभूत ठरतील असे अभ्यासक्रम त्यांना बनवावे लागणार आहेत.

महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील महिला अभ्यास केंद्रांच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. आर्थिक आणि सामाजिक विकास तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील महिलांचे योगदानही त्यात जाणून घेतले जाणार आहे.

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानात महिला कामगारांचे योगदान 27 टक्के, बांगलादेशात 33 टक्के, चीनमध्ये 61 टक्के, म्यानमार 51 टक्के, इंग्लंड 57 टक्के, अमेरिका 55 टक्के तर नेपाळमध्ये 82 टक्के आहे. हिंदुस्थानात आजही महिला कामगारांना पुरुषांपेक्षा 19 टक्के कमी पगार मिळतो. महिलांविषयक अभ्यासक्रमांद्वारे ही विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.