
सामना प्रतिनिधी । उल्हासनगर
घातक रसायन वालधुनी नदीत सोडल्याने पाच वर्षांपूर्वी उल्हासनगरकरांचा जीव घुसमटला होता. यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिकेने रसायनांची विल्हेवाट लावणाऱया टँकरमाफियांवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱयांचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कॅमेरांचा हा ठराव अजूनही कागदावरच राहिल्याने पुन्हा एकदा वालधुनी नदी घातक रसायनाने काळी-पिवळी झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा अक्षरशः कोंडमाराच होत असून आरोग्याशी खेळणाऱया सरकारी बाबूंविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
29 नोव्हेंबर 2014 च्या मध्यरात्री वडोल गावाजवळ वालधुनी नदीच्या पात्रात टँकरमाफियांनी उग्र वासाचे घातक रसायनयुक्त केमिकल सोडले होते. केमिकलच्या भयंकर दर्पाने शेकडो उल्हासनगरवासीयांना बाधा झाली होती. वृद्धांपासून लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सर्व पक्षीयांनी एकवटून टँकरमाफियांवर कारवाई करण्याची मागणी केल्यावर पोलिसांनी घातक रसायन आणून वालधुनी नदीत सोडणाऱया दोन टँकरचालकांना अटक केली इतकेच नाहीतर आयुक्त बालाजी खतगावकर यांनी नदीच्या किनारी 13 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी सुमारे सवा कोटीच्या निधीची तरतूद करून ठराव पास केला. पण हा ठराव कागदावरच राहिला असून पुन्हा टँकरमाफियांनी उच्छाद मांडला आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभाराने उल्हासनगरकरांचा जीव अक्षरशः घुसमटला आहे.
पात्रातच धरणे आंदोलन करणार
प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उल्हासनगरकरांनी येत्या 26 जानेवारी रोजी नदीच्या पात्रातच धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी उद्या सोमवारी वालधुनी नदीची पाहणी करणार असल्यांचे सांगितले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरांचा सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
– रसायनाच्या वासाचा त्रास नागरिकांना होऊ लागल्याने नगरसेवक टोनी सिरवानी, लाल पंजाबी, गजानन शेळके, वालधुनी जल बिरादरीचे शशिकांत दायमा यांच्यासोबत नागरिकांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. मात्र पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
– प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त शिवशंकर शॉपकीपर असोसिएशन, हिराली फाऊंडेशन, वालधुनी जल बिरादरी यांच्या पुढाकाराने आज वालधुनीची घातक रसायनयुक्त केमिकलपासून सुटका करण्याची हाक देण्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
































































