
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे पती तसेच परळ येथील एमजीएम हॉस्पिटलमधील निलंबित वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल किशोर वाघ यांच्या विरोधात अॅण्टी करप्शन ब्युरोने बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जुलै 2016 मध्ये रवींद्र नेवगे यांच्या तक्रारीवरून अॅण्टी करप्शन ब्युरोने लाचेचा गुन्हा दाखल करून त्या गुह्यात एमजीएम हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक गजानन भगत, वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल किशोर वाघ आणि संदेश कांबळे यांना अटक केली होती. त्यानंतर वाघ यांचे उत्पन्न, मालमत्ता आणि खर्चाबाबत सविस्तर चौकशी करण्यात आली. या कालावधीत त्यांचे उत्पन्न आणि त्यांनी केलेला खर्च याची सांगड घालण्यात आली. त्यांच्या स्थावर तसेच इतर मालमत्ता तपासण्यात आल्या. एसीबीच्या उघड चौकशीमध्ये वाघ यांनी आपल्या 2006 ते 2016 या सेवा कालावधीत कायदेशीर मार्गाने एक कोटी 14 लाख 64 हजार 940 रुपये इतके उत्पन्न मिळवले. याच कालावधीत त्यांनी उत्पन्नापेक्षा 10 लाख 43 हजार 445 रुपये अधिक म्हणजेच एक कोटी 25 लाख 8 हजार 385 रुपये इतकी रक्कम खर्च केली. तसेच दोन कोटी 18 लाख 11 हजार 603 इतक्या रकमेची मालमत्ता जमवली. याचा तपास केला असता एक कोटी 3 लाख 45 हजार 663 रुपये अर्थात 90.24 टक्के मालमत्ता ही उत्पन्नाशी विसंगत असल्याचे आढळून आले. या उत्पन्नाचा कायदेशीर स्रोत उपलब्ध करून देता न आल्याने वाघ यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे एसीबीच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.


























































