
केंद्रीय मंत्रिमंडळ केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर होऊ शकतो. केंद्र सरकार सध्याच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी ही वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. या वर्षी मार्चमध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने 47.58 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ देण्यासाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत 4 टक्क्यांनी वाढवून 42 टक्के केली होती. आय अँड बी मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, सरकारी तिजोरीवर एकत्रित परिणाम दरवर्षी 12,815.60 कोटी रुपये होईल. ही दरवाढ 01 जानेवारी 2023 पासून लागू झाली होती.
मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिवाळीच्या काही आठवड्यांपूर्वी अतिरिक्त डीए 4 टक्क्यांनी वाढवला होता.



























































