
लोकसंख्या नियंत्रणासाठी मोदी सरकार लवकरच कायदा आणणार असल्याचा दावा देशाचे अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी मंगळवारी केला. पटेल यांना लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. बरोंडा येथील गरीब कल्याण संमेलनात सहभागी होण्यासाठी ते छत्तीसगडच्या रायपूर येथे आले होते.
यावेळी ते म्हणाले की केंद्र सरकारने आपल्या कार्यकाळात जेव्हा इतके कठोर आणि मोठे निर्णय घेतले आहेत. तेव्हा बाकीचे मोठे निर्णय देखील घेतले जातील. त्यामुळे कोणीही काळजी करू नका, सरकार लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील आणणार असे ते म्हणाले.
यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतेच संसदेत सांगितले होते की, सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृती आणि आरोग्य मोहिम राबवत आहे. त्याचा यशस्वी वापर केला जात आहे. मात्र त्यासाठी कोणत्याही कायद्याची गरज नाही. यावेळी मांडविया यांनी आकडेवारीचा हवाला देऊन सांगितले की, लोकसंख्या नियंत्रणावरील सरकारची धोरणे ही कोणत्याही जबरदस्तीशिवाय आहेत. त्यामुळे जनजागृतीद्वारे देखील लोकसंख्या नियंत्रण करता येऊ शकते.
विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी लोकसंख्या नियंत्रण विधेयकाला विरोध केला होता. मात्र, भाजपच्य खासदारांसह अनेक नेतेमंडळींनी वेळोवेळी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर संसदेत बरीच चर्चा देखील झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत 35 हून अधिक वेळा दोन अपत्ये धोरण मांडण्यात आले आहे, परंतु हा कायदा मात्र बनला नाही.


























































