
गेल्या काही दिवसांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. सुमारे तासभर विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. अनेक ठिकाणी झाडे पडली असून, घरांचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. दिवसभर उकाडा व सायंकाळी ढगाळ वातावरण यामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले होते. मंगळवारी सायंकाळी अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पाऊस कोसळत होता. सात रस्ता परिसरात रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली होती. रामवाडी परिसरातील रेल्वे ब्रिजखाली मोठय़ा प्रमाणावर पाणी तुंबल्याने रहदारी बंद झाली होती. मुस्लिम पाच्छा पेठ, विजापूर वेस, बाळीवसे, कन्ना चौक आदी ठिकाणी हमरस्त्यावर पाणी तुंबल्याचे दिसून आले. अनेक झोपडपट्टय़ांमधील घरावरचे पत्रे उडाले असून, प्रापंचिक वस्तूचे नुकसान झाले आहे.
वीज पडून नऊ जनावरे मृत्युमुखी
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुडगूस घातला आहे. पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, माढा या तालुक्यांत झालेल्या पावसामुळे शेती पिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, काही ठिकाणी गारा पडल्या आहेत. वीज अंगावर पडून 7 बैल व 2 गायींचा मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे शहर व जिह्यात अनेक भागांत वीजही गायब झाली होती.




























































