कश्मीरप्रश्नी दोघांत तिसरा नाहीच! हिंदुस्थानची परखड भूमिका; ट्रम्प यांचा दावा खोटा

31

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कश्मीर प्रश्न हा हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोघांच्या चर्चेचा मुद्दा आहे. दोन्ही देशांतील चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. त्यामुळे दोघांत तिसऱ्याची गरज नाही, अशी स्पष्ट भूमिका आज परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत मांडली.दरम्यान, कश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी आपण तयार आहोत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्याला तशी विनंती केली होती, असे वक्तव्य सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. व्हाईट हाऊस येथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भेटीवेळी पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हा भलताच दावा केला. त्यावर आज विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली.

विरोधकांच्या गोंधळानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत सरकारची स्पष्ट भूमिका  मांडली. पंतप्रधान मोदींनी कश्मिरप्रश्नी कोणत्याही प्रकारची विनंती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेली नाही. तसेच कश्मिर प्रश्न हा द्विपक्षीय चर्चेचा मुद्दा आहे. केवळ दोन्ही देशांतील चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. तिसरा कोणताही पक्ष (राष्ट्र) या दोघांमध्ये येणार नाही. सिमला करार आणि लाहोर डिक्लेरेशननुसारच ही चर्चा होईल असे जयशंकर यांनी सांगितले. द्विपक्षीय चर्चादेखील सीमेपलीकडून (पाकिस्तान) होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबल्याशिवाय होणार नाही असेही जयशंकर यांनी ठामपणे सांगितले.

अमेरिकन सरकारने हात झटकले

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर हिंदुस्थानने जोरदार आक्षेप घेतल्यानंतर आता खुद्द अमेरिकन सरकारनेही हात झटकले आहेत. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहेत. कश्मिर प्रश्न हा हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील मुद्दा आहे. दोन्ही देशांकडून काश्मिर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाल्यास अमेरिका त्याचे स्वागत करेल असे या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानने दहशतवादविरोधात कठोर पाऊल उचलावे. दहशतवाद संपला पाहिजे ही अमेरिकेची भूमिका आहे असे निवेदनात म्हटले आहे.कश्मीरप्रश्नी द्विपक्षीय चर्चाच होऊ शकते. मात्र, पाकिस्तानातून होत असलेल्या दहशतवादी कारवाया थांबल्याशिवाय चर्चा होणार नाही-परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

ट्रम्प यांचे 10,796 दावे खोटे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खोटी वक्तव्ये करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सत्तेवर आल्यापासून ट्रम्प यांनी जून 2019 पर्यंत तब्बल 10796 भ्रामक, खोटी आणि वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. अमेरिकेचे दैनिक ‘वॉश्ंिग्टन पोस्ट’नेच ट्रम्प यांची पोलखोल केली आहे. ‘वॉश्ंिग्टन पोस्ट’च्या  फॅक्ट चेक (सत्य पडताळणी) विभागाने ट्रम्प यांच्या वक्तव्यांची तपासणी केली. त्यात सत्तेवर आल्यापासून ट्रम्प दररोज सरासरी 12 वादग्रस्त विधाने करीत आहेत. ट्रम्प खोटी, भ्रामक आणि वादग्रस्त वक्तव्ये करतात. त्यांच्या विधानांचा अमेरिकन सरकारच्या भूमिकेशी संबंध नसतो असे ‘वॉश्ंिग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या