
पॅलेस्टाईनमधील गाझा पट्टीत गेल्या दोन दिवसांपासून रॉकेट्स, गोळीबाराचाच आवाज येत असून इस्रायलचे सैनिक आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरूच आहे. इस्रायलने युद्ध पुकारल्यानंतर दोन दिवसांत 2 हजारांवर इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली असून हमासला मुळापासून उखडून टाकण्यासाठी इस्रायलला लागेल ती मदत पुरवू, अशी घोषणाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली.
अमेरिकेच्या सिनेटचे प्रतिनिधी चक स्कमर यांनी सांगितल्यानुसार पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी इस्रायलला लागेल ती मदत करण्याची हमी दिली आहे. सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांना इस्रायलला युद्धसामुग्री पुरविण्याबाबत विचारले असता त्यांनी सर्व प्रकारची मदत पुरवली जाईल असे सांगितले. त्यानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यानंतर अमेरिकेकडून भूमध्य समुद्रात युद्धनौकांचा ताफा पाठवण्यात आला. त्याचबरोबर अमेरिकेने एफ-35, एफ-15 आणि एफ-16 या लढाऊ विमानांनाही तयार ठेवल्याचे अमेरिकन सैन्य दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, हमासने आज पुन्हा इस्रायलच्या दिशेने रॉकेट हल्ले केले.
अमेरिका-इराणमध्ये कैद्यांची अदलाबदली
एकीकडे इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू असताना दुसरीकडे अमेरिका आणि इराणमध्ये 6 अब्ज अमेरिकन डॉलरचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार दोन्ही देश कैद्यांची अदलाबदल करणार आहेत. इराण आपल्या कैदेतील 5 अमेरिकन नागरिकांना सोडणार आहे. त्या बदल्यात इराणला दक्षिण कोरियातील बँकांमध्ये गोठवण्यात आलेला 6 अब्ज डॉलरचा निधी हस्तांतरीत करण्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मंजुरी दिली आहे.
हिजबुल्लाहची अमेरिकेला धमकी
इस्रायलचा दुश्मन असलेल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने थेट महाशक्ती असलेल्या अमेरिकेलाच धमकी दिली आहे. पॅलेस्टाईन युक्रेन नसून अमेरिकेने आपला हस्तक्षेप थांबवावा नाहीतर अमेरिकेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच हिजबुल्लाहने दिला आहे.
इस्रायलमध्ये 900 हिंदुस्थानी विद्यार्थी
इस्रायलमध्ये जवळपास 900 हिंदुस्थानी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशी माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे. सध्या हिंदुस्थानातील 18 हजार नागरिक इस्रायलमध्ये अडकले आहेत. तसेच जवळपास 85 हजार मूळचे हिंदुस्थानी असून त्यांच्याकडे इस्रायलचे नागरिकत्व आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्यांमध्ये हिंदुस्थानातून केरळमधील संख्या जास्त आहे. दरम्यान, नेपाळमधील 10 विद्यार्थ्यांचा हमासच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
गाझा पट्टीत संपूर्ण नाकेबंदी
हमासचे वर्चस्व असलेल्या गाझा पट्टय़ाला इस्रायली सैन्याने पूर्णपणे वेढा दिला असून गाझा पट्टीतील वीज, अन्न आणि इंधनपुरवठा तोडल्याची माहिती इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेण्ट यांनी दिली आहे. गाझा पट्टीची संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली आहे. आम्ही मानवी पशूंशी लढा देत आहोत. त्यामुळे आमची त्याच पद्धतीने कृती राहील असे गॅलेण्ट यांनी म्हटले आहे. मूलभूत गरजांसाठी गाझा पूर्णपणे इस्रायलववर अवलंबून आहे. दरम्यान, हमास आणि इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांनी शेकडो इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले असून यात मोठय़ा संख्येने महिला, वयोवृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियासह विविध देशांनी आर्थिक रसद थांबवली
इस्रायल आणि हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने पॅलिस्टिनींची आर्थिक मदत थांबवल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. पॅलेस्टिनींचा 20 दशलक्ष डॉलरचा निधी गोठवण्यात आला आहे. या युद्धाचा पॅलेस्टिनी तसेच इस्रायलच्या विकासावर दुरगामी परिणाम होणार आहे. जर्मनीच्या विकास मंत्र्यांनीही संपूर्ण परिस्थिती पाहूनच पॅलेस्टिनींसाठी आर्थिक मदत देण्यात येईल असे सांगिले. पॅलेस्टिनींना तब्बल 265 दशलक्ष डॉलरची मदत देण्यात येणार होती. परंतु ही मदत सध्या थांबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
- युद्धामुळे गाझा पट्टीतील जवळपास 1 लाख 23 हजारांहून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी पलायन.
- इस्रायलच्या सैन्याने लढाऊ विमाने, हॅलीकॉप्टर्स, विमाने आणि तोफखान्याच्या माध्यमातून गाझा पट्टीतील हमास आणि इस्लामिक जिहादचे 500हून अधिक तळ उद्ध्वस्त केले.
- सोमवारी हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे 16 सैनिक मारले गेले. 2 हजार 282 नागरिकांवर रुग्णालयांत उपचार करण्यात येत असल्याचे इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.






























































