हृदयद्रावक! बारशाच्या दिवशीच मुलीवर काळाने घाला घातला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तरप्रदेशात एक काळीज पिळवटणारी घटना घडली आहे. बारशाच्यादिवशीच बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. समारंभादरम्यान सिमेंटच्या पत्र्यांचे छत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून बाळाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बरेली ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरगंज तहसीलमधील मोहल्ला मालीपुरा येथे रात्री उशिरा ही दुर्घटना घडली आहे. बारशाच्या दिवशीच छत कोसळल्याने झालेल्या अपघातात अरविंद यांच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला.

अरविंद यांच्या घरी नऊ दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. तिची आई आशा तिला दुसऱ्या दिवसापासून किरण म्हणू लागली. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अरविंद यांच्या दोन मुलांचा याआधी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. यावेळी मुलगी जन्माला आल्याने नामकरणाचा सोहळा गुरुवारी मोठ्या थाटामाात आयोजित केला होता.  नातेवाइकांना बोलावण्यात आले, वस्तीतील लोकांना आणि शेजारच्या लोकांना मेजवानी देण्यात आली.

गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आशा रिमझिम पावसामुळे मुलीला आपल्या कुशीत घेऊन सिमेंटच्या पत्र्याच्या छताखाली उभ्या होत्या. पाऊस थांबल्यावर अंगणातील डान्स पाहण्यासाठी अनेक मुले, तरुण सिमेंटच्या पत्र्याच्या छतावर आले.छतावर वजन आल्याने सिमेंटचे छत खाली कोसळले. यामध्ये आशा (25), किरण (नऊ दिवस) रुबी, दामिनी, रमादेवी, सत्यम, हस्वती, वंशी आणि टेरेसवर उभी असलेली सहा मुले ढिगाऱ्याखाली गाडले गेले. काही मिनिटांतच किरणचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.